

लोणावळा: स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या भैरवनाथनगर, कुसगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलिीस ठाण्यात बालकाचे लैंगिक आपराधापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
ही घटना शुक्रवार (दि. 20) भैरवनाथनगर, कुसगांव बु. येथे फिर्यादी व आरोपी यांच्या राहत्या घरात घडली. घरात मुलगी एकटीच आहे याचा गैरफायदा घेत नराधाम बापाने बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर नराधमाने मुलीला या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आई घरी आल्यावर सदर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला.
त्यानंतर पीडितेच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत.