पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून वाकड येथील दत्तमंदिर रोडवर कारवाई सुरू आहे. यामुळे गर्दीने गजबजलेला हा रस्ता आज भूकंपग्रस्त किल्लारी गावासारखा ओसाड आणि भयावह वाटू लागला आहे. रस्त्यावर पडझड झालेल्या इमारती, उध्वस्त झालेले व्यवसाय आणि सामानाच्या ढिगाऱ्यांमुळे या भागाचे चित्र पालटले आहे. कारवाईमुळे व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र, असे असले तरी, आगामी काळात वाकड रोड अधिक प्रशस्त आणि सुंदर होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वाकड रोड हा खाण्याच्या गाड्या, छोटे-मोठे व्यवसाय आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध होता. हिंजवडी आयटी पार्कमुळे लोकांची कायम वर्दळ दिसायची. मात्र, सोमवारी (दि. ७) महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारल्यामुळे हा रस्ता पूर्णतः बदलून गेला आहे. रस्त्यावर अर्धवट पडलेल्या इमारती आणि विस्कटलेले साहित्य पाहून हा भाग भूकंपग्रस्त किल्लारी गावासारखा भयावह भासू लागला आहे.
व्यवसायिकांचे मोठे नुकसान
या कारवाईने शेकडो व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुकानदारांनी आयुष्यभराची कमाई लावून व्यवसाय उभा केला होता. "अचानक आलेल्या या कारवाईमुळे आमच्या व्यवसायाचा संपूर्ण नाश झाला आहे. आता पुन्हा कसे उभे राहावे, याचा विचारही करता येत नाही," असे एका दुकानदाराने 'पुढारी'शी बोलताना सांगितले. अनेकांनी वाचलेला माल उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळात बऱ्याच वस्तूंचे नुकसान झाले.
गर्दीमुळे वाकड रोडवरील व्यवसाय स्थानिकांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला होता. या भागातील रहिवाशांनी जागा भाड्याने देऊन लाखो रुपयांचे भाडे मिळवले होते. मात्र, कारवाईनंतर हा स्रोत बंद झाला आहे.
प्रशासनाचा निर्णय आणि नागरिकांचा रोष
महापालिकेने अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे सांगून कारवाईचे समर्थन केले आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि व्यवसायिकांनी महापालिकेवर आरोप करत ठिय्या आंदोलन केले. तरीही, महापालिकेने विरोध झुगारून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे.