

वर्षा कांबळे
पिंपरी : महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनाप्रमाणे आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) उपक्रम सुरू केला. उपक्रमात 124 मुद्यांवर ऑनलाइन माहिती भरायची आहे. परीक्षेच्या काळात हा नवीन उपक्रम सुरू केल्याने शिक्षकांची वाढीव कामामुळे दमछाक होत आहे. अद्यापही काही शाळांचे काम अपूर्ण आहे.
एससीईआरटीने राज्य मंडळाच्या सर्व शाळांना स्कॉफ 28 फेब—ुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ले होते. मात्र, बोर्डाच्या परीक्षा, त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या परीक्षा यामुळे बहुतांश शाळांची मुदतीत माहिती भरली गेली नाही. त्यामुळे एप्रिलपर्यंत या कामास मुदतवाढ देण्यात आली होती. शहरातील सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना ऑनलाइन मूल्यांकनाची लिंक दिली गेली आहे. या आराखड्यात शाळांनी स्वयं मूल्यमापन करणे अपेक्षित आहे. पण, शाळेतील शैक्षणिक उपक्रम, वार्षिक नियोजन, पालक सभा,
क्रीडा शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, वृक्षारोपण व पर्यावरणपूरक उपक्रम, ई-लर्निंगचा वापर अशा विविध प्रशिक्षणाशिवाय माहिती ऑनलाइन भरणे अशक्य आहे. शाळांना त्यामुळे वेळ कमी पडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
माहिती भरताना फोटो अपलोड करावे लागतात. या वेळी कधी नेटवर्कची समस्या येते. शिक्षकांना अध्यापनासह सर्व कामे सांभाळून ही माहिती भरताना अडचणी येत आहेत. उपक्रम नवीन आहे तसेच माहिती भरण्याचे काम वेळखाऊ आहे. -
एक शिक्षक
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून 127 मुद्यांवरील माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे. चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण, कथाकथन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ई-लर्निंग साहित्याचा वापर आदींचा यात समावेश आहे.