

पिंपरी : सायबर फसवणुकीसाठी बँक खाती पुरवणार्या सहा जणांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिस ठाण्याने अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून पिंपरी- चिंचवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
शुभम मोहन लोंढे (24, रा. पाटीलनगर, चिखली), सॅम ऊर्फ डेविड ऊर्फ संबीधकुमार श्रीपती नायक (22, रा. राऊलकिला, उडीसा), प्रोफेसर ऊर्फ हिमांशुकुमार गणेश ठाकुर (24, रा. हजारीबाग, झारखंड), राजअंश सिंग संतोष सिंग (21, रा. संगीता हाईट्स, भुगाव, मूळगाव हजारीबाग, झारखंड), गौरव अनिलकुमार शर्मा (40, रा. बलसाड, गुजरात), अंकुश रामराव मोरे (वय 31, गंगापूर खेड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हवालदार हेमंत खरात यांनी आरोपी शुभम लोंढेच्या संदर्भात गोपनीय माहिती मिळवली. शुभमने सायबर फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने डेविड ऊर्फ सॅम या आरोपीला खाती पुरवल्याचे कबूल केले.
सॅम हा मागील दोन वर्षांपासून टेलीग्रामद्वारे भारतातील खातेधारकांना संपर्क साधून त्यांची खाती कंबोडियातील मुख्य आरोपींना पुरवत होता. हिंजवडीतून सॅमला अटक केली गेली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुगाव, घोटावडे, भुकूम, बावधन आणि हिंजवडी येथील हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवून पाच अन्य खातेदारांना ताब्यात घेतले गेले.
राजअंश सिंग याला बावधन येथून अटक केली. तो बँक किट गोळा करून कंबोडियातील मुख्य आरोपींना पाठवायचा. सॅमच्या चौकशीतून कळले की, तो गेल्या दोन वर्षांपासून कंबोडियातील आरोपींसोबत कार्यरत होता. गुजरातमधील बलसाड येथून गौरव शर्मा आणि नाशिकमधील अंकुश मोरेलाही अटक करण्यात आली.
यांनी केली कामगिरी
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने केली आहे.