

पंकज खोले
पिंपरी : औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कुशल कामगारांची मोठी वानवा जाणवत आहे. अंगमेहनतीच्या कामाला नकार, अनेकवर्षे काम करून अपुरे वेतन, कंपन्यांतील बदलणारी धोरणे आणि कामाचा वाढता ताण, अशा अनेक कारणांनी कुशल कामगार कामे सोडून जातात. परिणामी, ऐनवेळी कामगार मिळत नसल्याने परराज्यातून आलेल्या अथवा अकुशल कामगारांकडून कामे करवून घेतली जातात. दुसरीकडे चिखली, कुदळवाडीतील मोठ्या प्रमाणात उद्योग विस्थपित झाल्याने अनेक कामगार आपल्या गावाकडे पतरले आहेत.
शहरात दहा ते बारा हजार लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत. प्रामुख्याने भोसरी, चाकण, पिंपरी, म्हाळुंगे, तळेगाव, तळवडे, चिखली या भागात काही व्यवसाय आहेत. दरम्यान, कारखान्यांमध्ये होणारे तांत्रिक बदल, व्यवस्थानातील धोरण आणि एकूणच कामाचा व्याप वाढल्याने कामगार टिकत नाहीत. विविध कंपन्यामध्ये राज्याप्रमाणेच परप्रांतिय कामागारांची संख्या मोठी आहे; परंतु काही कंपन्यांमध्ये अवजड कामे करण्यास कुशल कामगार करण्यास तयार होत नाहीत. परिणामी, इतर जिल्हयातून अथवा परप्रांतिय तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणेकरुन कामगारांची संख्या भरुन काढता येईल.वाहतूक कोंडीत प्रवास नकोच
कंपनीमध्ये अवजड अथवा हिट ट्रीटेमेंट खाली कुशल कामगारांना काम करावे लागते. त्यानंतर पुन्हा घरी परतताना वाहतूक कोंडी, प्रवास आणि त्यातून लागणारा वेळ यामुळे असे काम काही दिवसांनी कामगार सोडून जातात. चाकण, तळेगाव येथील कंपन्यांमध्ये येणारा कुशल कामगार वर्ग हा पिंपरी-चिंचवड परिसरातील आहे. मात्र, एक ते दीड तास लागणार वेळ, वाहतूक कोंडी आणि कामाचा वाढता व्याप हे पाहता कुशल कामारांची संख्या कमी होत आहे.
आयटीआय, दहावी पास झाल्यानंतर काही दिवस कंपनीत काम केले जाते. मात्र, अंगमेहनत, आठ तास अडकून पडणे याचबरोबर कामाच्या बदल्यात मिळणार कमी पगार या गणितामुळे अनेकांनी काम सोडून व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. त्यातच लाँड्री, छोटे कंत्राट दुकाने याकडे कल वाढल आहे. तर, सध्या सुरु असलेल ऑनलाईन पार्सल कामात मोठया प्रमाणात पैसे मिळत असल्याने या कामात अशा तरुणांची संख्या वाढली आहे.
चाकणमध्ये गेल्या दहा वर्षापासून नोकरी करतो. मात्र, आता उत्पादन कमी झाल्याने पगार वाढवला नाही. उलटपक्षी कामाचे तास वाढविण्यात आले. त्यातच वाहतूक कोंडीतील प्रवास, दुचाकीमुळे जडणार्या व्याधी यामुळे औषधांचा खर्च वाढला होता. त्यामुळे माझ्यासह चार कायम झालेल्या कामारांनी राजीनामा दिला आहे. एकत्रित छोटे युनिट उभे करण्याचा विचार आहे.
ज्योतीबा घनवट, कामगार, पिंपरी