

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजय संकल्प मेळावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.20) आयोजित केला आहे. मेळावा पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे दुपारी चारला होणार आहे. मेळाव्यात लोकसभेत विजयी झालेले आठ खासदारही उपस्थित राहणार आहेत, असे पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी गुरूवारी (दि.18) पत्रकार परिषदेत सांगितले.
कामठे म्हणाले की, पावसाळ्याचे दिवस असल्याने वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी 12 ते 15 हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे दहापैकी 8 जण विजयी झाले आहेत. शरद पवार हे प्रथमच शहरात अशा कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विजयी संकल्प करण्यात येणार आहे.
शरद पवार यांनी गेल्या 50 वर्षांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दुरदृष्टीय धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या सर्व कार्यकाळात ज्येष्ठ मान्यवरांची पवारांना भक्कम साथ लाभली, अशा सर्व जुन्या सहकार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हयात नसलेल्या ज्येष्ठ सहकार्यांच्या स्मृतिगंध स्वरूपी आठवणींना उजाळा देण्यात येईल. नवनिर्वाचित आठ खासदारांचाही सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमात अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.