Pimpri-Chinchwad | परप्रांतीयांमुळे शहरातील वातावरण कलुषित

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांत गंभीर गुन्हे घडू लागले आहेत.
परप्रांतीयांमुळे शहरातील वातावरण कलुषित
परप्रांतीयांमुळे शहरातील वातावरण कलुषितFile Photo
Published on
Updated on

संतोष शिंदे पुढारी प्रतिनिधी पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांत गंभीर गुन्हे घडू लागले आहेत. यातील बहुतांश प्रकरणात परप्रांतीय तरुणांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याशिवाय दरम्यानच्या काही किळसवाण्या गुन्ह्यातही अटक करण्यात आलेले आरोपी परप्रांतीयच निघाले आहेत.

त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांमुळे शहरातील वातावरण कलुषित होत असल्याचे बोलले जात आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून राजीवकुमार सिंह (३३) या शिक्षकाने बिहारहून पुण्यात येऊन प्रवीणकुमार महतो (२५, मूळ रा. मुजफ्फरनगर, बिहार) याचा धारदार शस्त्राने गळा चिरला.

राजीवकुमार यानेच प्रवीणकुमार याचे शीर धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. बावधन पोलिस चौकीजवळील नर्सरीमध्ये १८ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे हिंजवडीच्या पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. २३) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी प्रमोद कुमार (रा. बिहार) याने एकाचा दगडाने ठेचून खून केला.

हात उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. या व्यतिरिक्त मागील काळात घडलेल्या अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परप्रांतीय गुन्हेगारांमुळे शहराची बदनामी तसेच वातावरण कलुषित होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

नोंद नसल्याने भीतीही नाही

कामाच्या नावाखाली राज्यात येणाऱ्या परप्रांतीय तरुणांची कोणत्याही यंत्रणांकडे नोंद नाही. त्यामुळे गुन्हा केल्यानंतर त्यांना पकडले ज्याण्याची भीती वाटत नाही. कामगारांच्या नोंदी ठेवण्याचे प्रमाण वाढल्यास परप्रांतीयांच्या गुन्ह्यांमध्ये आपोआप घट होईल, असे जाणकारांचे मत आहे.

नोंदीचा प्रश्न ऐरणीवर

शहरातील परप्रांतीय लोंढ्याच्या नोंदींची मोठी समस्या आहे. कामगारांच्या नोंदी ठेवण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते; मात्र तरीही ठेकेदार, दुकान चालक-मालक आपल्याकडे असलेल्या कामगारांच्या नोंदी ठेवण्याबाबत उदासीन असल्याचे घडलेल्या घटनांवरून अधोरेखित झाले आहे.

कुटुंबीयांना सोडून राहणाऱ्या तरुणांचा सहभाग

अंगावर काटा उभा राहणाऱ्या किळसवाण्या गुन्ह्यांमध्ये कुटुंबीयांना सोडून शहरात एकट्याने राहणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. अशा तरुणांना मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहण्याचे व्यसन जडते. ज्यामुळे त्यांच्या डोक्यात घाणेरडे विचार येत असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात.

परप्रांतीयांमुळे परिसराची बदनामी

हळहळ वाटणाऱ्या गुन्ह्यांमुळे संबंधित शहरासह परिसराचे नाव माध्यमांवर येते. त्यामुळे परिसराचीदेखील मोठी बदनामी होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी वाकड येथे एका परप्रांतीयाने आठ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले होते. ज्यामुळे शहराचे नावदेखील बदनाम होत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

कामगारांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कामगारांच्या नोंदी ठेवण्याबाव यापूर्वी अनेकदा आवाहनही करण्यात आले आहे. परप्रांतीय कामगार कामावर ठेवताना त्याची पार्श्वभूमी तपासून घेणे गरजेचे आहे. नोंदणी न ठेवणाऱ्या मालकांवर यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news