

Pimpri Political News: मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे, मात्र राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि.27) पिंपरी येथे केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड, खेड, आळंदी, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर येथील पक्ष संघटनेच्या आढावा बैठका त्यांनी घेतल्या. त्यानंतर खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते.
खा. राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची पकड आहे. ही पकड कायम ठेवण्यासाठी मुंबईत स्वबळावर लढावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही. मुंबई सोडून राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीस एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे हायकमांड हे भाजप आहे. त्यामुळे भाजपने आदेश दिल्यानंतर त्यांना ते पद स्वीकारावे लागले. आपली कातडी वाचविण्यासाठी, स्वतःवरील खटले थांबविण्यासाठी ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लढत आहेत. भाजपकडून होणार्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ते सक्षम आहेत. सरकारमध्ये मंत्री असलेल्यांकडून समाजात तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली जात आहे.
आपल्या लोकांना सोडायचे आणि विरोधकांना पकडायचे यासाठी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. तसेच, भाजप देशभरात इतर पक्ष फोडण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोपही केला.
बेरोजगारीबाबत श्वेतपत्रिका काढावी
राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. आयटी अभियंते बेरोजगार आहेत. हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञाननगरीत पाच हजारांपेक्षा जास्त अभियंते नोकरीसाठी रांगेत थांबत आहेत. बेरोजगारीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी परिस्थिती असल्याचे खासदार राऊत म्हणाले.पिंपरीतील एकही जागा न लढल्याने बैठकीत खदखद शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी यावेळी त्यांच्या तक्रारींचा पाढा नेत्यांसमोर वाचला.
पिंपरी-चिंचवड शहरात, विधानसभेची एकही जागा न लढल्याने स्थानिक पदाधिकार्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पदाधिकार्यांना पाठबळ दिले जात नाही. संघटनेतील रिक्तपदे भरली जात नाहीत. संघटन वाढीसाठी गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.
महाविकास आघाडीसोबत महापालिका निवडणूक लढताना, अधिकाधिक इच्छुकांना संधी द्यावी. पक्षाने नमते घेऊ नये,स्थानिक पदाधिकार्यांना विश्वासात न घेता उमेदवार लादू नये, अशा तक्रारी नेते संजय राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या समोर मांडल्या.
यावेळी सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, आमदार बाबाजी काळे, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, समन्वयक केसरीनाथ पाटील, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, अशोक खांडेभराड, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, युवासेना शहर अधिकारी चेतन पवार, समन्वयक योगेश बाबर, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, तुषार नवले, विशाल यादव आदी उपस्थित होते.