भारत देश प्रगती करतानाच बलशाली होतोय, हे सहन न झाल्यामुळे देशातील आणि विदेशातील विघातक शक्तींनी एकत्र येऊन एक प्रकारचे षड्यंत्र रचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र संतांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करून हे प्रयत्न हाणून पाडले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) व्यक्त केले.
मोशी येथील वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते बोलत होते. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. संतांनी जनतेमध्ये निरपेक्ष जनजागृती केल्यामुळेच भारतीय संस्कृती जिवंत राहिली आहे, असे त्यांनी नमूद केले.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, आचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराज, ह.भ.प. ब्रम्हगिरी मारोती महाराज कुसेकर, भास्करगिरी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुती महाराज कुरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले संत, किर्तनकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय सभ्यता ही जगातली सर्वाधिक प्राचीन सभ्यता आहे. पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही सापडत असलेले अवशेष पूर्णपणे विकसित आहेत. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही. भारताची संस्कृती आणि विचार जेव्हा कमकुवत झाले त्या-त्यावेळी आपण गुलामगिरीत गेलो. येथील संतानी जागृती करुन एकसंघ समाज निर्माण केला. त्यामुळे दिग्विजयी भारत आपल्याला पाहायला मिळाला.
गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतीतील अडचणी आणि शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा नद्या स्वच्छ बनविण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करु.
स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, सेवा करण्याची संतांची वृत्ती असल्यामुळे हे राष्ट्र उभारले आहे. शिवरायांची कथा संतांनी सांगायला सुरुवात केली की देशात तेज निर्माण होईल. चंद्रभागा, इंद्रायणी नदी स्वच्छ करावी.