

पिंपरी चिंचवड : १३ लाखाच्या कर्जासाठी खाजगी सावकाराकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती बचावला. धक्कादायक बाब म्हणजे गळफास घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या १० वर्षाच्या मुलाची त्यांनी गळा दाबून हत्या केली. ही घटना रविवारी (दि.१९) पिंपरी चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी तिंघा खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे . शितल हांडे (वय ३६) व मुलगा धनराज वैभव हांडे (वय ९) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पिंपरी चिंचवड येथील वैभव हांडे यांनी तीन खाजगी सावकाऱ्यांकडून १३ लाख रुपये घेतले होते. हे कर्ज फेडता येत नसल्याने पती वैभव हांडे व पत्नी शीतल हांडे या दोघांनी मुलासह आपली जीवनयात्रा संपविण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी आपल्या दहा वर्षाच्या मुलाची आधी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दोघांनीही घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेतून पती बचावला तर पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीन खाजगी सावकारावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच मुलाची हत्या केल्याप्रकरणी पतीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.