Pimpri Chinchwad Crime: प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला

पिंपळे निलखमध्ये थरार; तिघे जखमी, दोघे ताब्यात
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पिंपरी : बहिणीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पिंपळे निलख परिसरात मंगळवारी (दि. ८) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. झटापटीदरम्यान हल्लेखोराच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याने तरुणाचा थोडक्यात बचाव झाला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, सांगवी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

अमोल वीर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यासह अनिकेत वीर आणि दीपक वीर हेही जखमी झाले आहेत. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रोहन लांडगे आणि संदीप लांडगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल वीर आणि लांडगे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे असून, त्यांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी अमोल यांनी लांडगे यांच्या बहिणीसोबत कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग रोहन आणि संदीप यांच्या मनात होता.

मंगळवारी दुपारी अमोल हे पिंपळे निलख परिसरात असताना रोहन आणि संदीप यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पिस्तूल आणि कोयत्याच्या सहाय्याने अमोल यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. झटापटीदरम्यान पिस्तूल हातातून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात अमोल यांच्यासह अनिकेत आणि दीपक हे दोघेही जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

“प्रेमविवाहाच्या विरोधातून मुलीच्या भावांनी तिच्या पतीवर खुनी हल्ला केला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
मनीषा कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news