आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्या हिंजवडी आयटीतील फेज-2 मध्ये पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या भागातील आयटी क्षेत्रात काम करणार्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाढत्या रहिवासी आणि व्यावसायिक वर्दळीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. अॅम्बेसी टेक-झोन कंपनीच्या सहकार्याने हे केंद्र उभारण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 17) सकाळी या केंद्राचे उद्घान करण्यात आले. या वेळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, कंपनीचे पदाधिकारी आणि परिसरातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच रहिवासी उपस्थित होते.
आयटी क्षेत्रातील तरुणींना कामाच्या वेळा बदललेल्या असतात. अनेकदा त्या उशिरा रात्री घरी परततात. अशा वेळी त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये. तसेच, अन्य नागरिकांनादेखील काही समस्या उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी हे मदत केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.
हिंजवडी फेज-2 पासून हिंजवडी पोलिस ठाणे आणि चौकीचे अंतर जास्त आहे. हा हिंजवडी आयटी हब परिसराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या आहेत. या भागात अनेक महिला आयटी व्यावसायिक कार्यरत असून त्यांची सुरक्षा ही पोलिसांवरील मोठी जबाबदारी आहे. या परिसरात रहिवासी सोसायट्या, व्यावसायिक इमारतीदेखील असल्यामुळे वर्दळ अधिक आहे. येथील महिलांसाठी तसेच इतर नागरिकांना पोलिस मदतीची आवश्यकता भासत असल्याने हिंजवडी फेज दोनमध्ये हे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.