

पिंपरी: पीएमआरडीए हद्दीतील बांधकामाबाबतची परवानगी आणि नियमावलीबाबत नागरिकांना माहिती व्हावी, तसेच त्यांच्या गैरसोय दूर करण्यासाठी पीएमआरडीएअंतर्गत बीपीएमएस मदतकक्ष स्थापन करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या तळमजल्यावर या कक्षामध्ये येणार्या अडचणींवर तात्काळ निराकरण येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षामध्ये या केंद्रात नेमलेल्या कर्मचार्यांना त्याबाबतचे विशेष ज्ञान नसल्याचे दिसून आले. तसेच , तांत्रिक कारणामुळे वारंवार ही प्रणाली बंद पडत असल्याचे दिसून आले. (Latest Pimpri News)
पीएमआरडीएकडून विकास परवानगी प्रक्रिया पारदर्शक व कार्यक्षम होत असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षामध्ये ही यंत्रणा फोल ठरत आहे. याबाबत त्या केंद्रात चौकशी केली असता, इंटरनेट सेवा बंद असल्याने ही प्रणाली विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.
तसेच, संबंधित प्रणालीचा डाटा आणि माहितीबाबत कर्मचार्यांना कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे ते कशा पद्धतीने काय निराकरण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पीएमआरडीए कार्यालयात विविध कामानिमित्त अभियंते, आर्किटेक्ट, विकसक तसेच नागरिक येत असतात. या संबंधितांना कामानिमित्त वारंवार कार्यालयात यावे लागू नये, यासाठी पीएमआरडीएकडून ऑनलाइनच्या माध्यमातून (बीपीएमएस) म्हणजेच बिल्डिंग प्लांट मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
मात्र ही प्रणाली किचकट असल्याचे खुद्द येथील कर्मचारी सांगतात. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करूनदेखील वारंवार होणार्या तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद पडत आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना पीएमआरडीएच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.