पिंपरी : पालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

निवडणुकीपूर्वी बदल्या करणार
पिंपरी : पालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या
Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४३६ अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. आयुक्तांनी त्याबाबत ऑगस्टमध्ये अहवालही मागवून घेत सप्टेंबरमध्ये बदल्या करणार असल्याचे सांगितले होते; मात्र महिना उलटूनही आयुक्तांनी बदल्या केल्या नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या बदल्या होणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असून,त्यासंदर्भात महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने एकाच विभागात सहा वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. त्यात एकूण ४३६ जणांचा समावेश आहे. गट 'अ' आणि 'ब' मधील ३६ अधिकारी, गट 'क' मधील तब्बल ३२९ कर्मचारी आणि टेक्निकल संवर्गातील ७१ कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल यासारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकार्यांचा समावेश आहे.

ऑक्टोबर महिना आला तरीही बदल्या केलेल्या नाहीत. प्रशासनाने दिलेली डेडलाइनदेखील हुकली आहे. तर आयुक्त राजकीय दबावाखाली बदल्यांचा निर्णय घेत नसल्याची महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

निवडणुकीपूर्वी बदल्या करणार

महापालिकेतील बदलीस पात्र असणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाची फाईल तयार आहे. निवडणूक आचारसंहितेच्या आधी महापालिकेतील पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news