

पिंपरी: पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासोत्त्पत्ती होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत मलेरियाचे चार तर डेंग्युचे सात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
जुलै महिन्यामध्ये 11, 154 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मलेरियाच्या 10,962 संशयित रुग्णांपैकी 4 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर डेंग्यूच्या 191 संशयित रुग्णांपैकी 7 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचा 1 संशयित आढळला आहे. (Latest Pimpri News)
पावसाने उघडीप दिल्यानंतर सतत बदलत्या हवामानामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा डास व मच्छराची सर्वाधिक उत्पत्ती असणारा ऋतू आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे नाले भरुन वाहण्याचे थांबले आहेत. त्यामुळे कचरा आणि इतर गोष्टी तशाच नाल्यांमध्ये साचून राहिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ’ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे हा आहे. त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.