

पिंपरी: शहरामध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे आत्तापर्यंत 30 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 21 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सध्या एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.
जीबीएस आजाराच्या एका रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. जीबीएस आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिका वैद्यकीय विभागाकडून गृहसर्वेक्षण केले जात आहे. त्याअंतर्गत आत्तापर्यंत 27 हजार 604 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
16 पथकांमार्फत ही कार्यवाही केली जात आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये जीबीएससाठी लागणार्या औषधांचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. जीबीएस आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित महापालिकेच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, या आजाराच्या प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी केले आहे.