Pimpri Politics: युती की आघाडी? प्रभाग आरक्षण अन् वरिष्ठांच्या निर्णयावर इच्छुकांचे भवितव्य

निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे.
Pimpri News
युती की आघाडी? प्रभाग आरक्षण अन् वरिष्ठांच्या निर्णयावर इच्छुकांचे भवितव्यFile Photo
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आहे. महापालिका निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशी होणार की स्वतंत्रपणे लढली जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, आरक्षण सोडतीत प्रभाग सुटणार की अडचण होणार, यावरून अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

चारसदस्यीय 32 प्रभागाची प्रारूप रचना 22 ऑगस्टला प्रसिद्ध झाली आहे. निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. निवडणूक युती की आघाडीत लढली जाणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा व विधानसभेप्रमाणे युती व आघाडीत निवडणूक होईल, का याबाबत पक्षश्रेष्ठींकडे सातत्याने विचारणा केली जात आहे. (Latest Pimpri News)

Pimpri News
MahaMetro: निगडी-रावेत-चाकण मेट्रो मार्गाबाबत लोकप्रतिधींकडून सूचना; महामेट्रोकडून प्रकल्पाचे सादरीकरण

महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 77 माजी नगरसेवक होते. तर, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 माजी नगरसेवक होते. एकत्रित शिवसेनेचे 9 माजी नगरसेवक इतकी ताकद होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन स्वतंत्र पक्ष होऊन माजी नगरसेवक विभागले गेले आहेत. तर, भाजपाच्या काही माजी नगरसेवकांनी पक्षाला राम राम करत दुसर्‍या पक्षाची वाट धरली आहे.

राज्यातील भाजपासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा भाजपकडे जास्त ओढा असल्याचा दावा सत्ताधार्‍यांकडून करण्यात येत आहे.

शहरात भाजपकडे सर्वाधिक माजी नगरसेवक तसेच, इच्छुक आहेत, असे सांगितले जात आहे. ती बाब लक्षात घेऊन, भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

त्याबाबत वरिष्ठांनाही सांगण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांच्या निर्णयास पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा केला जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही भाजप स्वबळावर स्वतंत्र लढेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

Pimpri News
Pimpri: सुटला की धरला...! सात महिन्यांत गंभीर गुन्ह्यातील 338 आरोपींना जामीन; 315 जणांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष आहे. पक्षाकडे माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांची संख्या अधिक असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकारी दाखवत आहेत. हातातून निसटलेली महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीनेही केली आहे.

वारंवार पिंपरी-चिंचवड शहराचे दौरे करुन स्वबळाचा नार्यास अजित पवारांकडूनही प्रोत्साहन दिले जात असल्याची चित्र आहे. पुण्यातील बैठकीतही त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याच हेतूने महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्याच्या विरोधात राष्ट्रवादीकडून महापालिकेवर महामोर्चा काढण्यात होता. लोकहितासाठी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या कोट्यातील अधिकाधिक जागा पदरी पाडून घेण्यासाठी आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या डीपीविरोधात तसेच, कुदळवाडीतील अतिक्रमणविरोधी कारवाईच्या विरोधात पक्षाने आंदोलन करीत आक्रमकता स्पष्ट केली आहे.

मतविभाजनाचा फटका बसणार

युती व आघाडी न झाल्यास यंदाची महापालिका निवडणूक रंगदार ठरणार ठरेल, असे जाणकार सांगत आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाहता महापालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी असणार आहे. मतदारांना प्रत्येक प्रभागात रणसंग्राम पाहावयास मिळेल. चुरशीच्या लढतीत मत विभाजन होऊन मातब्बर उमेदवाराला फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

विरोधातील महाविकास आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी होईल, याबाबत असे सांगण्यात स्थानिक पदाधिकारी कचरत आहेत. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे पक्ष शहरातील काही ठराविक भागांत सक्षम आहेत.

विरोधकांकडून आंदोलन केले जात आहेत; मात्र त्याची धार बोथट असल्याचे दिसत आहे. आघाडी करण्याबाबत स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जात आहे. तर, आम आदमी पक्षाने स्वबळावर लढण्याचा नारा पूर्वीच दिला आहे.

महापालिकेत एक माजी नगरसेवक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान, युती व आघाडी झाल्यास अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. तर, तसे न झाल्यास काठावर असलेले काही इच्छुक हव्या त्या पक्षाच्या जहाजात स्वार होऊन निवडणूक उतरण्याच्या तयारी आहेत. त्या दृष्टीने ते सोयीस्कर पक्षासोबत जवळीक करुन आहेत. समोर उमेदवार पाहून ते आपला पक्ष ठरवणार आहेत.

नजरा आरक्षणाकडे

महापालिकेत एकूण 128 जागा आहेत. त्यापैकी 93 जागा या आरक्षित असणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर सुनावणी होवून प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर ऑक्टोबर 2025 ला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. एससी, एसटी, ओबीसी व महिला आरक्षणात प्रभाग सुटतो की अडकतो, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

प्रभागात आरक्षण पडल्यास आजूबाजूच्या प्रभागातही चाचपणी करण्याची अनेकांनी मनाची तयारी करुन ठेवली आहे. तयारी केलेल्या प्रभागातच महिला आरक्षण पडल्यास पत्नी, आई किंवा सून यांना उमेदवारी देण्याबाबतही अनेकांनी तयारी केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांना कुटुंबातील महिला सदस्याची आवर्जून उपस्थिती लावली जात आहे. तसेच, फ्लेक्स, होर्डिंग व सोशल मीडियावर इच्छुकांसोबत महिला सदस्यांचे छायाचित्र ठळकपणे झळकवले जात आहे.

शिवसेनेची मर्यादित ताकद

शहरात एक खासदार असतानाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद मर्यादित स्वरूपात आहे. महायुती झाल्यानंतर या पक्षाला मोठा लाभ मिळेल, अशी समीकरणे स्थानिक पदाधिकार्यांकडून मांडली जात आहेत. महायुतीत निवडणूक लढण्याचा नारा शिवसेनेकडून वारंवार दिला जात आहे. मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची सर्व मदार भाजपवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news