

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला असून, रविवारी (दि. ३०) आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. विवाहासाठी दोघींनी रजेचा अर्जही सादर केल्याची माहिती आहे. या निर्णयाची सध्या पोलिस दलात चर्चा सुरू आहे.
दोघींची ओळख पोलिस भरतीच्या काळात झाली. भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या पोलिस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघींची मुख्यालयात नियुक्ती होती. त्यानंतर शहरातील एकाच पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली. याच काळात त्यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली आणि पुढे दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
दोघींच्या नात्याची माहिती कुटुंबीयांनाही मिळाली. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला विरोध केला असून, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित विषय असल्याने प्रशासनाने त्यामध्ये थेट हस्तक्षेप केलेला नसल्याचे समजते. आवश्यकतेनुसार समुपदेशनाची भूमिका घेतली जाऊ शकते. दरम्यान, प्रस्तावित विवाहासाठी दोन्ही कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात रजेचा अर्ज दिला असून, त्यासोबत विवाह सोहळ्याची पत्रिकाही जोडली आहे.