

पिंपरी: भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले असून, आकुर्डी येथील ग. दि. मा. नाट्यगृह हे सुधारित प्रारूप विकास योजना आराखड्याच्या सुनावणीसाठी डिसेंबरपर्यंत आरक्षित आहे. त्यामुळे कार्यक्रम घेणाऱ्या संस्थांना नाट्यगृह शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गळती, खुर्च्या तुटणे, साऊंड सिस्टिम खराब होणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने ते दुरुस्तीसाठी बंद केले आहे. ही दुरुस्ती कधी पूर्ण होणार याची निश्चित तारीख नाही.
आकुर्डी येथील ग. दि. मा. नाट्यगृहात प्रारुप आराखड्याच्या सुनावण्या सुरू असून, प्रशासनाने त्यासाठी डिसेंबरपर्यंत नाट्यगृह बुक केले आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, शालेय स्पर्धा, पुरस्कार सोहळे यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहावर ताण येत आहे.
या नाट्यगृहाचे बुकिंग तीन-तीन महिने आधी फूल झाले आहे. तारीख मिळत नसल्याने अनेक संस्थांना आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागत आहेत किंवा पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह किंवा पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी जावे लागत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप का?
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महापालिकेने नाट्यगृहांची उभारणी केली आहे. कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास तिमाहीचे ऑनलाईन (पुढील ३ महिन्यांचे) बुकिंग घेतले जाते. अशा स्थितीत कार्यक्रम घेताना राजकीय हस्तक्षेपाचा केल्यानंतर हवी ती तारीख मिळते, असे निदर्शनास आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप का सहन करावा लागतो, असा सवाल कलाकारांकडून विचारला जात आहे.
इंटरनेटअभावी आकडेवारी उपलब्ध नाही
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील या वर्षीच्या कार्यक्रमांची आकडेवारी देता येणार नाही. प्रेक्षागृहात इंटरनेट नाही आणि लिपिक उपलब्ध नाही, असे कारण देत आकडेवारी देण्यात व्यवस्थापकाकडून टाळाटाळ केली जाते.
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि ग. दि. मा. ही दोन नाट्यगृह सध्या उपलब्ध नसली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी चिखली टाऊन हॉल, सांगवीचे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपरीचे आचार्य अत्रे नाट्यगृह यांचा विचार करता येईल. भोसरीचे लांडगे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होईल हे अद्याप सांगता येणार नाही.
- पंकज पाटील, क्रीडा उपायुक्त, महापालिका