

Tathawade Mother Ends Life
पिंपरी: आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) ताथवडे येथे उघडकीस आली. प्राथमिक तपासात जेवणातून विष घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कल्पना बिपीन सूर्यवंशी (वय ३५), सुभश्री बिपीन सूर्यवंशी (वय १७) आणि दादू बिपीन सूर्यवंशी (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना सूर्यवंशी या आपल्या दोन मुलांसह ताथवडे येथील जी. जी. इंटरनॅशनल स्कूलच्या मागे भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यांचे माहेर यवतमाळ येथे असून सासर संभाजीनगर येथे आहे. त्यांचे पती संभाजीनगर येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर त्यांच्या बहिणीचे कुटुंब राहत होते.
सोमवारी दिवसभर कल्पना आणि त्यांची मुले घराबाहेर न दिसल्याने बहिणीला संशय आला. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दरवाजा वाजविला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला बोलावून घेतले. घराची खिडकी उघडून पाहिले असता तिघेही घरात झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. खिडकीतून पाणी टाकूनही कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात कल्पना सूर्यवंशी यांनी सकाळी इडली व सांबर तयार केले होते. या अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळून त्यांनी स्वतःसह मुलांना खायला दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून काही नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कल्पना सूर्यवंशी यांनी घर खरेदीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना कर्जाचे हप्ते नियमित भरता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी संबंधित बँकेकडून घर लिलावात काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे त्या मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
ताथवडे येथे आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन व रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
— अशोक कडलक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे