

संतोष शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सुरू असलेल्या अवैध शस्त्र विशेष मोहिमेत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल 116 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोयत्यापासून पिस्तुलापर्यंत अशी शस्त्रे हिसकावून घेत पोलिसांनी 99 गुन्हे दाखल केले असून, यामध्ये आतापर्यंत 431 गुणांची कमाई झाली आहे. या ‘गुणांच्या शर्यती’त पथकांनी चुरशीने सहभाग नोंदवला असून, विजेतेपद कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत एकूण 99 गुन्हे दाखल झाले असून 116 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यात 69 कोयते, 4 सुरे, 1 सत्तूर, 3 पालघन, 4 तलवारी, 35 पिस्तुले आणि 62 काडतुसे यांचा समावेश आहे. आर्म्स अॅक्ट कलम 3(25) अंतर्गत 29 गुन्हे तर कलम 4(25) अंतर्गत 70 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
या मोहिमेत कोयता, सुरा, तलवार यांसारखे धारदार शस्त्र पकडल्यास एका गुणाची नोंद होत आहे; तर पिस्तूल हस्तगत केल्यास दहा गुण दिले जात आहेत. या आगळ्या-वेगळ्या पद्धतीमुळे पोलिस ठाण्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विजेते ठरणार्या पथकाला पोलिस आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान देण्यात येणार आहे.
परिमंडळ - 1
पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-1 मध्ये पिंपरी, संत तुकारामनगर, चिंचवड, निगडी, भोसरी, दापोडी, सांगवी आणि रावेत या ठाण्यांनी कामगिरी केली. मिळून 22 शस्त्रे जप्त करण्यात आली असून झोन-1 ला 94 गुणांची नोंद मिळाली. संत तुकारामनगरने 1 पिस्तूल व 6 कोयते, भोसरीने 1 पिस्तूल व 3 कोयते, निगडीने 1 पिस्तूल व 2 इतर शस्त्रे, सांगवीने 1 पिस्तूल व 2 इतर शस्त्रे, तर पिंपरी, दापोडी व रावेत यांनी प्रत्येकी 1 पिस्तूल जप्त केले.
परिमंडळ - 2
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ- 2 मध्ये देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, हिंजवडी, बावधन, वाकड आणि काळेवाडी ठाण्यांचा समावेश आहे. या झोनमध्ये 22 शस्त्रे जप्त झाली असून 85 गुणांची कमाई झाली. देहूरोड ठाण्याने 1 पिस्तूल व 3 कोयते, तळेगाव दाभाडेने 2 पिस्तुले व 1 इतर शस्त्र, शिरगावने 1 पिस्तूल व 2 शस्त्रे, हिंजवडीने 1 पिस्तूल व 4 शस्त्रे, बावधनने 1 पिस्तूल व 3 शस्त्रे, वाकडने 1 पिस्तूल व 1 शस्त्र, तळेगाव एमआयडीसीने 1 शस्त्र जप्त केले. मात्र, काळेवाडी पोलिस ठाण्याची कामगिरी शून्यावर आहे. झोन-1 च्या तुलनेत झोन-2 ने पिस्तुलांची संख्या कमी जप्त केली आहे.
परिमंडळ - 3
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या देखरेखीखाली झोन-3 मध्ये आत्तापर्यंत 16 शस्त्रे जप्त झाली असून केवळ 34 गुण मिळाले आहेत. या झोनमध्ये चाकण, दिघी, चिखली व एमआयडीसी भोसरी ठाण्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. मात्र, आळंदी आणि महाळुंगे ठाण्यांनी प्रत्येकी एक पिस्तूल पकडून सहभाग नोंदवला.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी मोहिमेत सर्वाधिक चमकदार कामगिरी केली. आतापर्यंत त्यांनी 18 पिस्तुले, 45 काडतुसे आणि 56 घातक शस्त्रे जप्त करून तब्बल 217 गुणांची नोंद केली आहे. गुन्हे शाखा युनिट-4 चे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे 6 पिस्तुले, 10 काडतुसे आणि 7 कोयते जप्त करून 67 गुणांची नोंद केली. तर सहाय्यक निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडाविरोधी पथकाने 4 पिस्तुले, 31 काडतुसे आणि इतर शस्त्रे जप्त करून 45 गुण मिळवले.