

मिलिंद कांबळे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेला 2032 साली 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने ‘पीसीएमसी व्हिजन 50’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 7 वर्षांत महापालिकेच्या सेवांमध्ये कोणते आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. भविष्यात शहराच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात, याचा कृती आराखडा करण्यात येत आहे. त्याद्वारे शहराच्या सौंदर्यात भर घालून शहरवासीयांना नागरी सुविधा व सेवा सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, संपूर्ण शहरात वाहतूक कनेक्टिव्हिटीचे जाळे निर्माण करून पर्यावरणपूरक व आनंददायी वाहतुकीसाठी रस्ते तयार करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 मध्ये झाली. येत्या 2032 मध्ये म्हणजे सात वर्षांनी महापालिकेला 50 पूर्ण होत आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत काय काम केले आणि महापालिका 50 वर्षांची होत असताना काय काम करणार आहे, याचा ऊहापोह महापालिका प्रशासन करीत आहे.
आत्तापर्यंत महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहराचा मोठा विकास केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. मात्र, या पेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन या क्षेत्रांमध्ये अजून काय काम करता येऊ शकते, याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांकडून मागविली आहे. विभागप्रमुखांकडून माहिती मागवून त्याचा पुढील सात वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सध्या सुरू असलेले काम, भविष्यात काय करता येऊ शकते, अडचणी काय येऊ शकतात, त्या सोविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कामातील वेगळेपण काय असेल, नागरिकांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल, याबाबत विभागप्रमुखांकडून आपापल्या विभागाची माहिती मागविण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपल्या विभागात काय वेगळे काम करता येईल, अजून चांगल्या पद्धतीने सेवा कशा पुरवता येतील, या संदर्भात माहिती द्यायची आहे. या माहितीच्या आधारे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाच्या कामाचे महत्त्वाचे मुद्दे काढून त्याच्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यशाळा घेतली जाणार आहे.
शाश्वत दणवळण व्यवस्था, पर्यावरण आणि नागरिकांचे जीवनमान, क्रीडा, सांस्कृतीक, पर्यटन, कायदा, प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, आर्थिक विकास, शिक्षण या विषयांवर येत्या 7 वर्षांत मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे. दळणवळण व्यवस्थेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी जनजागृती करणे. सायकल, इलेक्ट्रिक-व्हेईकल वापर वाढविणे, सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, बीआरटीएस तसेच, मेट्रोचे जाळे तयार करणे. हरित सेतूअंतर्गत चालणे व सायकल चालविण्यायोग्य स्वतंत्र मार्ग तयार केले जाणार आहेत. ते मार्ग उद्यानांना जोडले जाणार आहेत. पर्यावरण विभागाद्वारे कचरामुक्त शहर, वायू, ध्वनी व जल प्रदूषणमुक्त शहर करणे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे. क्रीडा, सांस्कृतिक, पर्यटन विभागाद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे. मैदाने, क्रीडांगण, स्टेडियम तसेच, क्रीडा प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवून क्रीडा स्पर्धा, मेळावे, मॅरेथॉनसारखे उपक्रम राबविणे. या प्रकारे सर्व विभागांमध्ये काम करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या सिटी ट्रान्सफोर्मेशन ऑफिसच्या (सीटीओ) माध्यमातून या पूर्वीच शहर विकास आराखडा बनविण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी सुरूच आहे. महापालिकेला 50 वर्षे पूर्ण होत असताना पिंपरी-चिंचवड शहराची वेगळी ओळख निर्माण व्हावी, या दृष्टीने या आराखड्यात काही गोष्टी नव्याने अंतर्भूत करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीसीएमसी व्हिजन 50’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने सर्व विभागाकडून माहिती मागविण्यात येत आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
महापालिकेच्या ‘पीसीएमसी व्हिजन 50’ या उपक्रमात नागरिक व स्वयंसेवी संघटना आणि संस्थांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. खासगी संस्था, हॉटेल्स असोसिएशन, बांधकाम व्यावसायिक संघटना, वैद्यकीय विभागात काम करणार्या संघटना, पथारी संघटना, एमआयडीसी संघटना, लघुउद्योजक संघटना, वाहतूक संघटना, पर्यावरण व वृक्षप्रेमी संघटना, संस्था आणि प्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.