Pimpri Chinchwad Firing | सराईत गुन्हेगाराने हवेत गोळी झाडत पोलिसांना दिला चकवा, उसाच्या शेतातून झाला पसार!

रांजणगाव येथील पिंपरी दुमाला येथे फिल्मी स्टाईल थरार, पोलिसांनी लावला होता सापळा, पोलिसांच्या कारची धडक बसूनही पळून जाण्यात यशस्वी
Firing in the air
Pimpri Chinchwad Firing File Photo
Published on
Updated on

पिंपरी : चऱ्होली येथे तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देत हवेत गोळीबार करून पलायन केल्याची थरारक घटना रांजणगाव येथील पिंपरी दुमाला गावात घडली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, पोलिसांच्या कारची धडक बसल्यानंतरही आरोपीने हवेत गोळीबार करत उसाच्या शेतात पळ काढला. ही घटना शनिवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

शेखर संभाजी जाधव (वय २५) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दिघी पोलीस ठाण्यात यापूर्वीच त्याच्याविरुद्ध गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथे करण राठोड यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार फरार झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक तपास करत होते. त्यावेळी आरोपी शेखर जाधव पिंपरी दुमाला गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला पकडण्याची तयारी केली.

दरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपी शेखर जाधव याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारमधून त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर पोलिसांच्या कारची आरोपीच्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर आरोपी दुचाकी जागीच टाकून पळत सुटला. पुढे जात त्याने पिस्तुलातून हवेत फायर केले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गोळीबार करत आरोपी जवळील उसाच्या शेतात घुसला. पोलिसांनीही मागोमाग शेतामध्ये घुसून त्याचा पाठलाग केला. मात्र उसाचे दाट पीक आणि अंधाराचा फायदा घेत आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अतिरिक्त फोर्स घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरात नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news