

पिंपरी : अधिक लाकडे गोळा करून देण्याचे आमिष दाखवून आणि हातावर शंभर रुपये टेकवून १४ वर्षीय बौद्धिक दिव्यांग मुलीला मोटारीत बसवले. त्यानंतर निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदे परिसरात उघडकीस आला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुसट दिसणाऱ्या मोटारीवरील खासगी ‘स्टिकर’चा धागा पकडत आरोपीला बेड्या ठोकल्या. गुरुवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
हाशिम अश्रफ शेख (२३, रा. हनुमान चौक, शेळकेवाडी फाटा, घोटावडे, पुणे; मूळ रा. बनिहाल, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारी दुपारी लाकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी त्या रस्त्याने मोटारीतून जाणाऱ्या आरोपीने तिला एकटे असल्याचे पाहिले. मुलगी लाकडे गोळा करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आणखी लाकडे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी तिला शंभर रुपयेही दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी मोटारीत बसली. त्यानंतर आरोपीने तिला मुळखेडच्या पुढील निर्जन डोंगराळ परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर त्याने मुलीला पुन्हा आणून सोडले.
मुलीची रक्तबंबाळ अवस्था पाहून एका महिलेने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सुरुवातीला घटनास्थळाच्या हद्दीवरून हा कॉल पुणे ग्रामीण पोलिसांकडे वळविण्यात आला. मात्र, पडताळणीनंतर प्रकरण बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच बावधन पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली.
पीडित मुलगी बौद्धिक दिव्यांग असल्याने तिला घडलेला प्रकार सविस्तर सांगता येत नव्हता. गुंडाविरोधी पथकाने तिला विश्वासात घेऊन संवाद साधला असता तिने पांढऱ्या रंगाच्या मोटारीचा उल्लेख केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले. चार ते पाच संशयित मोटारींचे क्रमांक मिळाल्यानंतर त्यांची छाननी करण्यात आली. त्यातील एका मोटारीवरील खासगी कंपनीचे स्टिकर पुसटसे दिसत होते. मुलीनेही संबंधित मोटार ओळखली. स्टिकर आणि वाहन नोंदणीच्या आधारे तपास केला असता ती मोटार बावधन येथील एका कंपनीची असल्याचे समोर आले.
गुंडाविरोधी पथकाने संबंधित कंपनी गाठली असता संशयित मोटारीसह आरोपी हाशिम शेख तेथे मिळून आला. सुरुवातीला त्याने मुलीला केवळ लिफ्ट दिल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.
अवघ्या बारा तासांत आरोपी गजाआड!
पीडित मुलगी बौद्धिक दिव्यांग असल्याने आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे सुरुवातीला ठोस माहिती नव्हती. अशा परिस्थितीत गुंडाविरोधी पथकाने उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलवली. परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची छाननी, संशयित वाहनांची पडताळणी आणि संबंधित कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. घटना घडल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. मर्यादित माहिती असतानाही तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावल्याने पथकाचे कौतुक होत आहे.