

पिंपरी: भोसरी भागातील हवा गत 24 ते 48 तासांपासून घातक या गटांत गेली आहे. इतकी खराब हवा दिल्ली येथे गणली जात आहे. शनिवारी आणि रविवारी भोसरी भागातील हवेचा निर्देशांक तब्बल 421 ते 427 इतका गणला गेला. तसेच, शहरातील बहुतांश भाग हे गंभीर ते खराब गटांत वारंवार जात आहेत.
शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब ते अतिखराब गटात जात आहे. गत चोवीस तासांत भोसरी येथील हवेची गुणवत्ता 421 ते 427 मायक्रो ग््रॉम प्रति.चौ.मी.इतकी गणली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे ही गुणवत्ता घातक गटात आहे. तसेच, शहरातील शिवाजीनगर, निगडी, मुंढवा ,केशवनगर, पिंपरी-चिंचवडसह बहुतांश भागांतील भागांची हवा गंभीर गटांत गणली जात आहे.
शहराचे क्षेत्रफळ मुंबईपेक्षा जास्त असून 500 चौ.मी पेक्षा जास्त विस्तार झाला आहे. लोकसंख्येत मोठी वाढ होत असताना दुप्पट ते तिप्पट संख्येने वाहने वाढत आहे. वाहन इंधनाच्या प्रदूषणासह शहरात धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर हवेत उर्त्सजित होत आहेत. याला बांधकामाची धूळ देखील तेवढीच जबाबदार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता दिवाळीनंतर पाऊस थांबताच खराब गटांत जाते. त्यानंतर डिसेंबरपासून अतिखराब गटांत गेली. जानेवारी ती गंभीर, तर फेबुवारीत घातक प्रकारांत जात आहे. यंदा प्रथमच भोसरी येथील हवेची गुणवत्ता गत चोवीस तासांत 400च्या वर गेली आहे.
सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले
हवेच्या गुणवत्तेत सूक्ष्म धूलिकण 10 पीएम. आणि अतिसूक्ष्म धूलिकण 2.5 यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. वाहन इंधन ज्वलनातून हे कण बाहेर पडतात. शहरातील सततची वाहतूककोंडी हे मोठे कारण यामागे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. यामुळे शहरात श्वसनाचे विकार वाढत आहेत.
शहरातील वाहतूक कोंडी हे प्रमुख कारण या मागे आहे. शहराच्या विविध भागांत बांधकामांची धूळदेखील वाढत आहे. औद्योगिक प्रदूषणाचा यात सहभाग तुलनेत कमी आहे. भोसरीबाबतची अशीच स्थिती आहे. तरी मी अधिकाऱ्यांना भोसरीबाबत विचारणा करतो. त्यावर काय उपाय योजना करता येईल, याकडे लक्ष देण्यात येईल.
बाबासाहेब कुकडे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे