‘विशाखा’कडे चार वर्षांत केवळ पाच तक्रारी

अर्थ वर्षाला केवळ एक तक्रारदार महिला पुढे येत आहे
vishakha samiti
File Photo
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 7 हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचार्‍यांना लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण मिळावे, म्हणून मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती (विशाखा) आहे. या समितीकडे गेल्या चार वर्षांत केवळ 5 तक्रारी आल्या आहेत. त्याचा अर्थ वर्षाला केवळ एक तक्रारदार महिला पुढे येत आहे. त्यावरून समितीच्या विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनंदिन कामकाज करताना महिला कर्मचार्यांना लैंगिक छळ करण्याचा प्रकार काही अधिकारी व कर्मचार्यांकडून होतो. त्याबाबत संबंधित महिला विभागप्रमुखांसह आयुक्तांकडे तक्रारी करते. प्रसंगी फौजदारी तक्रारही दाखल करू शकते. क्षेत्रीय कार्यालय, प्रत्येक विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, शाळा आदी ठिकाणी त्या विभागासाठीही विशाखा समिती आहे.

महापालिकेत या समितीची मध्यवर्ती समिती आहे. मात्र, तक्रारदार महिला पुढे येत नाहीत. तक्रार समितीसमोर न आल्याने समितीकडून त्यावर कार्यवाही होत नाही. परिणामी, तक्रारींचे प्रमाण अल्प असल्याचे स्पष्ट होत आहे.

सात हजार कर्मचार्‍यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकार

महापालिकेत तब्बल 6 हजार 822 अधिकारी व कर्मचारी आहेत. ते विविध विभागात काम करतात. त्यातील 2 हजार 278 महिला अधिकारी व कर्मचारी आहेत. महापालिका मुख्यालय, 8 क्षेत्रीय कार्यालय, 17 करसंकलन विभागीय कार्यालये, 138 प्राथमिक शाळा, 18 माध्यमिक शाळा, रुग्णालय व दवाखाने तसेच, गोदामे व विविध कार्यालयांत महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी, मानधन तसेच, विविध एजन्सींमार्फत अनेक महिला कर्मचारी काम करतात. त्यामुळे महिलांची संख्या मोठी आहे.

महिलांना बदनामीची भीती

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार विशाखा समितीकडून चौकशी केली जाते. त्यात तक्रारदार महिलेचे नाव गुप्त राहत नाही. उलट त्या महिलेची बदनामी होण्याची भीती असते. तक्रारदार महिलेस विविध प्रकारे त्रास दिला जातो. अडचणी निर्माण केल्या जातात. अधिकार्‍यांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

अडीच महिने अध्यक्षपद रिक्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी असलेल्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या (विशाखा समिती) अध्यक्षपद तब्बल अडीच महिने रिक्त होते. सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी 31 मार्च 2023 ला निवृत्त झाल्या. त्यानंतर हे पदावर नियुक्ती न झाल्याने ते पद रिकामे होते. महापालिका प्रशासनाने त्यानंतर अध्यक्षाची नियुक्ती केली. त्यावरून महापालिका समितीबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

तपासणीनंतरच कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे 16 मे 2023 ला आले आहे. मी नवीन असल्याने महिलांच्या तक्रारीबाबत अधिक सांगता येणार नाही. मात्र, प्राप्त झालेल्या तक्रारींवर चौकशी करून कारवाई केली जाते, असे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा विशाखा समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला गोडसे यांनी सांगितले.

कारवाईवरून असमाधान

अधिकारी व कर्मचार्‍यांकडून महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ होण्याची शक्यता असते. असे अनेक प्रकार पालिकेत घडले आहेत. त्याबाबत त्रस्त महिलांनी थेट आयुक्तांपर्यंत तक्रार केली आहे. त्यानंतर, त्या तक्रारी विशाखाकडे देण्यात आल्या आहेत. समितीने महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयुक्तांनी दोषींवर कारवाईही केली आहे. मात्र, ही कारवाई समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे.

समितीकडून चौकशी

पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापक डॉक्टरांकडून लैंगिक छळ होत असल्याचा प्रकार सोशल मीडियाद्वारे उजेडात आला. त्यानंतर काही विद्यार्थिंनीनी विशाखा समितीकडे तक्रार करीत न्यायाची मागणी केली. त्या तक्रारींची चौकशी विशाखा समितीमार्फत सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news