

पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली.
रिंकू मल्हारी भोसले (22, रा. मोहननगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रिंकू यांचे वडील राजेंद्र धोंडीराम पौळ (50, रा. धाराशिव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिंकू यांचे पती मल्हारी संपत भोसले (वय 22) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्हारी याने लग्नानंतर पाच महिन्यांपासून पत्नी रिंकू यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांचा छळ केला. दारूच्या नशेत त्यांना सतत मारहाण करत माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होता.
सतत भांडण करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अखेर या त्रासाला कंटाळून रिंकू यांनी राहत्या घरी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तपास पिंपरी पोलिस करत आहेत.