

Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हॉटेल, ढाबा व बेकरी या ठिकाणी लाकूड व कोळसा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. त्याऐवजी एलपीजी गॅस, इलेक्ट्रिक ओव्हन, बायोगॅस, किंवा ग्रीन गॅस वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचा वापर न केल्यास पहिल्यांदा 5 हजार, दुसर्यांदा 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे. त्यानंतर हॉटेल, ढाबा व बेकरी सील केली जाणार आहे.
शहरातील हॉटेल, ढाबा व बेकरी या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी सर्रासपणे लाकूड व कोळसा वापरला जातो. त्यामुळे हानिकारण कण, कार्बन मोनोऑक्साईड तयार होऊन वायू प्रदूषणात भर पडते. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
हे रोखण्यासाठी हॉटेल, ढाबा आणि बेकरी येथे लाकूड व कोळसा वापरण्यास बंदी घातली आहे. त्याऐवजी केवळ लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) किंवा नैसर्गिक वायू वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
हॉटेल, ढाबा व बेकरी येथील भट्टीसाठी तसेच, रस्त्याकडेच्या खाद्यपदार्थ विक्री करणार्यांना लाकूड व कोळसा न वापरता एलपीजी गॅस, इलेक्ट्रिक ओव्हन, बायोगॅस, किंवा ग्रीन गॅसचा वापर करणे अनिर्वाय करण्यात आले आहे. तसेच, सर्व आस्थापनांना भट्टीसाठी 11 मीटर उंचीची आणि ओव्हनसाठी 19 मीटर उंचीची चिमणी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, धूळ संग्राहक करणारे यंत्र (डस्ट कलेक्टर मशिन) लावावे.
या नियमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर गॅस आणि इलेक्ट्रिक ओव्हन या नैसर्गिक इंधनाचा वापर न केल्यास पहिल्या वेळेस 5 हजार रुपये दंड केला जाणार आहे. दुसर्या वेळेत 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तिसऱ्या वेळेस ती आस्थापनेस टाळे लावून सील केले जाणार आहे. ही कारवाई आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या नवीन धोरणास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.