पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ८३ किलोमीटर अंतरामध्ये अंतर्गत रिंगरोड (इनर रिंगरोड) विकसित करण्यात येत आहे. या रस्त्यावर पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणी मल्टिमोडल हव विकसित करण्यात येणार आहे.
त्यामुळे एकाच ठिकाणी वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत. पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये एकूण १३ मल्टिमोडल हब आरक्षित आहेत. त्यापैकी प्राधान्याने ५ मल्टिमोडल हब विकसित करण्यासाठी पीएमआरडीएच्या सभेत नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
सोळू, वाघोली, कदमवाक वस्ती, भिल्लारेवाडी आणि भूगाव अशा पाच ठिकाणी मल्टिमोडल हब विकसित केले जाणार आहेत. या हबसाठी आवश्यक भूपादन आणि बांधकामासाठी एकूण ३७० कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. पीपीपी तत्त्वावर त्यांचा विकास करण्याचे नियोजित आहे.
रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामांतर्गत निरंगुडी ते वडगाव शिंदे या अंतरातील रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. सोळु ते निरगुडीदरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाची छाननी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) यांच्या वतीने छाननी सुरू आहे. दरम्यान, याबाबत पीएमआरडीएचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम सध्या सुरू असले तरी प्रत्यक्ष रस्ता उभारणीला मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या रस्त्यासाठी सोळु, निरगुंडी आणि वडगाव शिंदे येथे ३७.५ हेक्टर इतकी जागा संपादित केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
पीएमआरडीएकडून एकूण ८३ किलोमीटर अंतर्गत रिंगरोड विकसित केला जात आहे. त्यासाठी १४ हजार २०० कोटी रुपये इतका एकूण खर्च अपेक्षित आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे असा सुमारे ५ किलोमीटर अंतराचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी पीएमआरडीए- च्या अर्थसंकल्पात ११३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.