

राहुल हातोले
पिंपरी-चिंचवडकरांना विदेशी गाड्यांची भुरळ पूर्वीपासूनच आहे. या दिवाळीसणात शहरवासीयांनी करोडो रुपये किंमत असलेल्या इम्पोर्टेड गाड्यांच्या खरेदीस पसंती दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती असल्याने एकूण 20 इलेक्ट्रिक गाड्यांची नागरिकांनी खरेदी केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
दसरा, दिवाळीसारख्या शुभ मुहूर्तावर घरोघरी नवनव्या वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीच्या सुरुवातीपासून वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत शहरात 7 हजार 340 वाहनांची खरेदी करण्यात आली. काही श्रीमंत नागरिकांनी इम्पोर्टेड वाहनांचीही खरेदी केली. याद्वारे आरटीओच्या तिजोरीत 42 कोटी 70 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने अनेकांचे व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच मोठमोठ्या पगाराचे पॅकेजच्या नोकर्या असल्याने शहरात करोडपतींची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे आवडीनुसार अनेकजण या वाहनांची खरेदी करतात. यावर्षी दिवाळीत शहरातील काही करोडपतींनी रोल्स रॉयस, बेंटले, फरारी, लॅम्बोर्गिनी, डुकाटी आदी प्रकारच्या करोडो रुपये किंमत असलेल्या इम्पोर्टेड वाहनांच्या खरेदीस पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
शहरात इम्पोर्टेड वाहने किती?
दिवाळीमध्ये एकूण 37 इम्पोर्टेड वाहनांची खरेदी करण्यात आली असून, यापैकी 20 वाहने ही इलेक्ट्रिक आहेत.
इम्पोर्टेड वाहन म्हणजे काय?
ज्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनांची संपूर्ण बांधणी विदेशात केली जाते. पूर्ण तयार झालेली वाहने एखाद्या देशात नागरिकांच्या मागणीनुसार आयात केली जातात. अशा वाहनांना इम्पोर्टेड वाहन म्हणतात.
इम्पोर्टेड वाहने महाग का?
या वाहनांची खरेदी करताना मालकाला आयात कर भरावा लागतो. यासह सीमाकराची रक्कम भरावी लागत असल्याने इम्पोर्टेड वाहनांच्या किंमती अधिक असतात.
हौसेखातर मोजले सात करोड
शहरातील एका व्यक्तीने आपली महागडी वाहनाची आवड जोपासण्यासाठी सात करोड रुपयांचे इम्पोर्टेड वाहन खरेदी केल्याची नोंद आरटीओमध्ये दिसून आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक शहर असल्याने उच्चभ्रू नागरिकांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. काही लोक दरवर्षी सणासुदीच्या काळात विदेशातील करोडो रुपये किंमतीच्या वाहनांची खरेदी केली जाते.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिहवन अधिकारी, पिंपरी-चिंचवड