

पिंपरी: महामेट्रोकडून दापोडी ते चिंचवडच्या सेन्ट मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या पिलरवर आकर्षक जाहिरात लावण्यात आल्या आहेत; मात्र अनेक ठिकाणी दुभाजकांत राडारोडा तसेच माती पडून असून दुभाजक सुशोभीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर महामेट्रोकडून दापोडी ते चिंचवडच्या सेन्ट मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग बांधण्यात आला आहे. या मार्गास अडथळा ठरणारे दुभाजक तसेच, बस थांबे महामेट्रोकडून तोडण्यात आले होते. (Latest Pimpri News)
काम संपल्यानंतर वारंवार तगादा लावल्यानंतर महामेट्रो प्रशासनाने दुभाजक व बस थांब्याची दुरूस्ती केली; मात्र अद्याप सर्व दुभाजकांमध्ये माती टाकून रोपे लावण्यात आलेले नाहीत. तसेच, सुशोभिकरण करण्यात आलेले नाही.
रोपे लावण्याचे काम अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. असे असताना मेट्रोच्या सर्व पिलरवर दोन्ही बाजूने आकर्षक जाहिराती लावण्यात आल्या आहेत. विद्युत रोषणाईतील हे जाहिरात फलक वाहनचालकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अनेक ठिकाणी दुभाजकांत माती टाकलेली नाही. त्यामुळे तेथे दगड व कचरा साचला आहे. तसेच, काही ठिकाणी माती टाकली असली तरी, रोपे लावलेली नाही. व्यवस्थित निगा न राखल्याने काही ठिकाणचे रोपे वाळून गेली आहेत. कासारवाडी मेट्रो स्टेशनखालील दापोडीच्या दिशेने जाणार्या मार्गावरील मोठी झाडे सुकली आहेत.
दुभाजकावर माती टाकून रोपे लावल्यानंतर जाहिरातबाजी करण्यास हरकत नव्हती. काम अर्धवट असताना जाहिरातीचे बॉक्स लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.
अद्याप काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर
महामेट्रोकडून पिंपरी ते फुगेवाडी मार्ग 6 मार्च 2022 ला सुरू झाला आहे. त्यानंतर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट हा मार्ग 1 ऑगस्ट 2023 ला सुरू करण्यात आला आहे. असे असताना पिंपरी ते दापोडी मार्गावर अद्याप मेट्रो स्टेशन खाली काम करण्यात येत आहेत. काम केले जात असल्याने रस्ते बंद केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पिंपरी, नाशिक फाटा व इतर मेट्रो स्टेशनखाली काम केले असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.