

Crime News: वडगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका महिलेचा अज्ञात कारणासाठी आरोपीने खून केल्याची घटना घडली असून, वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. सलीमखान ऊर्फ साईबाबा खान, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी मृत महिला सुनीता शर्मा (वय 32 वर्षे) हीचे पती राजकरण कुशवाह, (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी सुनीता ही मंगळवारी (दि .12) सकाळी सातच्या सुमारास पैसे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर गेली होती. मात्र ती घरी परत आली नाही. म्हणून फिर्यादी राजकरण हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आले असता त्यांना दत्त मंदिर पाठीमागील बाफना यांच्या नर्सरीत एका महिलेचा मृतदेह पडला असल्याचे समजले. त्यामुळे तेथे जाऊन पाहिले असता सदर मृत महीला ही फिर्यादीची पत्नी सुनिता असल्याचे निष्पन्न झाले. तिचे दोन्ही हात व पाय बांधलेले दिसले. तिच्या डोक्यावर मारल्याने जखम झाली होती.
दरम्यान, आरोपी हा मृत महिलेच्या घरी दररोज जेवणाचा डबा आणण्यासाठी जात होता तसेच, तो घटनास्थळापासून 100 ते 150 मीटर अंतरावरच राहत असल्याने व फिर्यादी हा पंचनामा करुन परत येत असताना तो त्याचेशी बोलला नाही. तसेच सकाळी सुनीता घरातून गेल्यांनतर आरोपीने फिर्यादीच्या घरी येवून सुनिता ही टेम्पोत बसून तळेगावला गेल्याचे सांगितले होते. यावरून सबंधित आरोपी यानेच कोणत्यातरी अज्ञात कारणाने सुनिता हिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शितलकुमार डोईजड, उपनिरीक्षक सांगळे, ऋतुजा मोहिते, सुनील जावळे, पोलीस हवालदार सचिन देशमुख, सचिन गायकवाड, संजय सुपे, आशिष काळे, गणपत होले, सचिन काळे, विशाल जांबळे पोलीस शिपाई संपत वायाळ विठ्ठल पतुरे, चेतन कुंभार, गणेश होळकर, संजय बगाड,प्रतीक राक्षे, प्रफुल गोरे, देविदास भांगे, किरण ढोले यांनी अतिशय कसोशीने तपास करून अतिशय कमी वेळेत गुन्हा उघड करून आरोपी यास अटक केली आहे.
आरोपी सलीमखान उर्फ साईबाबा याच्यावर यापूर्वी नागपाडा पोलीस स्टेशन मुंबई येथे 2007 साली खुनाचा गुन्हा दाखल असून त्यात सदर आरोपीला शिक्षा झाली असून सदर आरोपी मार्च 2022 मध्ये बाहेर आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कदम यांनी दिली.