लोणावळा : लोणावळा व मावळ परिसरामधील पर्यटनस्थळे ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळी धरणे व नद्या तसेच धबधबे, गडकिल्ले डोंगर-दर्या हे मावळ तालुक्याचे वैभव आहे. या वैभवाचा व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pimpari chinchwad News)
दोन दिवसांपूर्वी लोणावळा शहराजवळ असलेल्या बलवान धरणाच्या मागील बाजूला पोहण्यासाठी उतरलेल्या एका सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या दुसर्याच दिवशी चाकणजवळ चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याच्या खोलीची माहिती नसताना धोकादायकरित्या केलेले पर्यटन हे जीवावर बेतू शकते याची ही उदाहरणे आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर धरण परिसरामध्ये तसेच गडकिल्ले व डोंगर या भागात ट्रेकिंगसाठी जाणार्या पर्यटकांची संख्या वाढत जाते. या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणांची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. त्याकडे कानाडोळा करुन धोकादायक ठिकाणी जाऊ नये, पाण्याच्या प्रवाहात उतरणे जसे धोकादायक आहे तसेच निसरड्या गडकिल्ले व दरांच्या ठिकाणी जाणेदेखील धोकादायक आहे याची पर्यटकांनी काळजी घ्यावी व सुरक्षित पर्यटनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन लोणावळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.