

दीपेश सुराणा
पिंपरी : लोककलांना असलेला राजाश्रय व लोकाश्रय कमी झाल्याने या कलांचे अध्ययन करण्याचे प्रमाण तरुण पिढीत कमी झाले आहे. लोककलेच्या माध्यमातून पूर्णवेळ कार्यक्रम घेऊन उपजीविका चालविणे लोककलावंतांना दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे. ठराविक जयंती महोत्सवांसाठी तसेच, काही कालावधीपुरतेच कार्यक्रम त्यांना मिळत आहेत. ही एकूणच परिस्थिती पाहता काही लोककला या लुप्त होत चालल्या असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे लोककलावंतांपुढे जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तमाशा, पोवाडा, लावणी, भारुड, गोंधळ, बहुरूपी, वासुदेव, पोवाडा, अशा अनेक कला आणि त्यांचे सादरीकरण करणारे कलाकार सध्या कमी होत आहेत. दंडार, सोंग, झडत्या, पांगूळ, कलापथक अशा अनेक लोककलांद्वारे मनोरंजनातून समाजप्रबोधन व जनजागृती केली जात असे. तमाशा, लावणी, दंडार आजही थोड्याफार प्रमाणात होत आहेत. लावणीमध्ये रिमिक्स वाढले आहे. पोतराज, वासुदेव, भराडी, पिंगळा हे कलावंत उपेक्षित राहिले आहेत. पिंगळा, वासुदेव या लोककलावंतांची परिस्थिती तर सध्या हलाखीची झाली आहे. या कलावंतांना काम मिळाले तरच त्यांची कला जिवंत राहू शकते.
शाहिरी क्षेत्रात गंभीर परिस्थिती
सध्या शाहिरी क्षेत्रात खुपच गंभीर परिस्थिती आहे. शाहिरांना जत्रा, यात्रा आणि जयंतीपुरते कार्यक्रम मिळतात. त्यांना दर महिन्यातून किमान 15 कार्यक्रम मिळाले तर त्यांचा चरितार्थ चालू शकतो. त्यामुळे पूर्णवेळ शाहिरी करणे अवघड झाले आहे, अशी माहिती शाहीर प्रकाश ढवळे यांनी दिली.
सध्या नाट्यगृहांमध्ये किंवा विविध ठिकाणी लावण्यांचे कार्यक्रम थोडे-फार चालतात. त्यातून मोजक्या महिलांनाच रोजगार मिळतो. मात्र, तमाशांचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, एका तमाशाच्या कार्यक्रमासाठी किमान 70 ते 150 लोकांना सांभाळावे लागते. विविध गावांमध्ये त्यासाठी फिरावे लागते. त्या तुलनेत अपेक्षित बिदागी आणि कार्यक्रम मिळत नाही.
लोककलांच्या संवर्धनाची गरज
सध्या तान्हुल्याला झोपविण्यासाठीदेखील आईला टीव्हीवरची गाणी सुरु करावी लागतात. अशा वेळी जुन्या प्राचीन लोककलांची आठवण येणे स्वाभाविक आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक प्रबोधनपर लोककला या सध्या अंतिम घटका मोजत आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा लोककलावंतांनी व्यक्त केली आहे.
वृद्ध कलावंतांना अत्यल्प मानधन
शासनाकडून वृद्ध कलावंतांना सध्या दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन दिले जात आहे. 50 वर्ष वय असलेले आणि अटीशर्तीनुसार पात्र ठरणार्या कलावंतांनाच हे मानधन मिळत आहे. यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे बरेच वृद्ध कलावंत त्याच्या लाभापासून अद्याप दूरच आहेत.
लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोककलाकारांना कार्यक्रम मिळणे गरजेचे आहे.
त्यांना बिदागी देखील व्यवस्थित मिळायला हवी.
शासकीय योजनांच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी ठरावीक मानधन निश्चित करून लोककलावंतांवर सोपवावी.
लोककला नष्ट होऊ नये, यासाठी त्याबाबत शासनाने विविध उपक्रम राबवून जनजागृती करायला हवी.