दीपेश सुराणा
लघुउद्योगांमध्ये वाढत्या आगीच्या घटना लक्षात घेता पिंपरी येथील एफ-2 ब्लॉकमध्ये अग्निशमन केंद्रासाठी एमआयडीसीचा सुमारे 1 एकराचा भूखंड आरक्षित असताना तेथे गेल्या दोन वर्षांपासून अग्निशामक केंद्राचे काम होऊ शकलेले नाही. या जागेवर केंद्र विकसित करण्याची लघुउद्योजकांची मागणी आहे.
तथापि, 2 अग्निशमन केंद्रामध्ये किमान 5 किलो मीटरचे अंतर ठेवण्याच्या द़ृष्टीने तसेच एमआयडीसी परिसर आणि नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल, अशा दुसर्या भूखंडाच्या शोधात अग्निशामक दल आहे.
उद्योगांसाठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना गेल्या 10 वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, त्याला प्रत्यक्ष मुहूर्त मिळालेला नाही. पिंपरी एफ-2 ब्लॉक येथील आरक्षित भूखंडात हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी यापूर्वी बर्याच बैठकांमध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर 2022 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत आयोजित उद्योजकांच्या मेळाव्यात देखील या भूखंडामध्ये अग्निशामक केंद्र उभारण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी याबाबत मंत्रालयात बैठकही घेतली होती. वर्षभरात हे काम सुरु करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे त्या वेळी देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झालेली नाही.
पिंपरी एफ-2 ब्लॉक ऐवजी संभाजीनगर, कृष्णानगर, शाहूनगर या परिसरात अग्निशामक केंद्रासाठी जागा मिळते का, याचा शोध महापालिका अग्निशामक दलाकडून घेतला जात आहे. पिंपरी एफ-2 ब्लॉकमधील भूखंडापासून संत तुकारामनगर येथील अग्निशामक केंद्र 2 ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. किमान 5 किलोमीटर अंतरावर अग्निशामक केंद्र असल्यास ते योग्य ठरेल. या केंद्राद्वारे उद्योजक आणि रहिवाशी भागातील नागरिकांची सोय होऊ शकणार आहे, असे अग्निशामक दलातील एका अधिकार्याने खासगीत बोलताना सांगितले.
तळवडे, कुदळवाडी परिसरामध्ये सध्या आगीच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे येथील लघुउद्योगांना अग्निशामक ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक केले जात आहे. एकीकडे त्यासाठी प्रशासन कठोर झाले असताना दुसरीकडे एमआयडीसी परिसरात अग्निशामक केंद्र उभारण्याबाबत कार्यवाही केली जात नसल्याने उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसी परिसरासाठी पिंपरी एफ-2 ब्लॉक येथे प्रस्तावित असलेल्या अग्निशामक केंद्राचे काम सुरु होणे गरजेचे आहे. याबाबत दोन वर्षांपूर्वी उद्योगमंत्र्यांसमवेत बैठक झाली होती. त्या वेळीच महापालिका प्रशासनाने पुढील वर्षभरात हे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्ष उलटल्यानंतरही हे काम रेंगाळले आहे. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.