

दीपेश सुराणा पुढारी प्रतिनिधी
पिंपरी : कोरोना कालावधीत आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्याने, त्याचा फटका हिंजवडी इन्फोटेक पार्क आणि तळवडे आयटी पार्कमधील अनेक आयटी अभियंत्यांनाही बसला होता.
तथापि, आता पुन्हा या क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. नवे कौशल्य आत्मसात करणाऱ्या अभियंत्यांना प्राधान्याने वाढती मागणी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरालगत हिंजवडी आणि खराडी येथे बड्या आयटी कंपन्यांचे बस्तान आहे.
त्याखालोखाल तळवडे, येरवडा, कल्याणीनगर, बाणेर आदी परिसरात आयटी कंपन्या कार्यरत आहेत. आयटी क्षेत्राची चलती पुन्हा एकदा वधारली आहे. आयटी अभियंत्यांना मोठ्या पगाराचे पॅकेज मिळत असल्याने या क्षेत्रात करिअरसाठी तरुणाईचा कल वाढत चालला आहे.
आयटी क्षेत्रामध्ये दररोज नवनवे शोध लागत आहेत नव्या तंत्रज्ञानांना आत्मसात करून कौशल्य कुशलता असलेल्यांना मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत काळानुरुप आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पायथॉन, क्लाऊंड कॉम्प्युटिंग, मशिन लर्निंग, ऑटोमेशन मधील कौशल्ये आत्मसात करणार्या आयटी अभियंत्यांची डिमांड वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील उद्योगांमध्ये सध्या ऑटोमेशन (यांत्रिकीकरण) रोबोटिक्स (विविध कामांसाठी रोबोटेचा वापर) तंत्रज्ञांना मोठी मागणी आहे. त्याच बरोबर एआयवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे हे ज्ञान आत्मसात करणाऱ्या उमेदवारांची उद्योगांना गरज आहे. पर्यायाने, तरुणांकडून नवनवीन कौशल्ये आत्मसात केली जात आहेत.
कोरोना लॉकडाऊनची परिस्थिती असताना आयटी अभियंत्यांना वर्क फ्रॉम होम तर, काहींना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र सध्या त्याउलट बदललेली टर्नअराऊंड स्टोरी पाहण्यास मिळत आहे. आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. पर्यायाने, मनुष्यबळाच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे अनुभवी अभियंत्यांबरोबरच नवोदितांना देखील नोकरीच्या संधी मिळत आहेत.
नवनवी कौशल्ये आत्मसात करणार्या अभियंत्यांना चांगली डिमांड आहे. हिंजवडी, खराडी येथील कंपन्यांमध्ये जास्त वाव आहे. त्याखालोखाल तळवडे, येरवडा, कल्याणीनगर, बाणेर येथील कंपन्यांतही संधी मिळत आहे. -
राहुल औटी, आयटी अभियंता.
आयटी कंपन्यांमध्ये नवोदित अभियंते, कर्मचारी यांना संधी मिळत आहे. सध्या स्टार्टअप कंपन्या आणि याक्षेत्रात गुंतवणूक वाढल्याने मनुष्यबळाच्या मागणीतही वाढ झाली आहे. येथे सतत नवे कौशल्य शिकणार्यांना चांगला वाव आहे. मशीन लींग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स ज्ञानाचे महत्त्व वाढले आहे.
प्रज्योत चोरडिया, आयटी अभियंता.