

वडगाव मावळ: प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटप तसेच पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट वाटपाचा सोहळा तसेच सुमारे 381 लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या जागेच्या सातबारा उतार्यांचे वाटप करण्यात आले.
वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. (Latest Pimpri News)
आमदार शेळके म्हणाले, तालुक्यातील आदिवासीबांधवांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळावे, यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या वन महसूल जिल्हा परिषद अशा सर्व विभागाच्या अधिकार्याचे विशेष आभार मानले. संबंधित अधिकार्यांच्या सहकार्याने व काही दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे तालुक्यातील 100 टक्के आदिवासीबांधवांना स्वतःची हक्काचे घरे मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले तर समाजात मोठा बदल घडतो याचे उदाहरण म्हणजे मावळ तालुक्यात राबविण्यात आलेली ही योजना आहे. सात महिन्यांत 1000 कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असून, येत्या दोन महिन्यांत शंभर टक्के लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून देऊ असेही आश्वासन दिले. आदिवासीबांधवांना स्वतःची जागा नसल्याने घर देऊ शकत नव्हतो; परंतु आता जागा उपलब्ध झाल्याने सर्वांना हक्काची घरे मिळतील, असाही विश्वास व्यक्त केला.
मावळ पॅटर्न जिल्ह्यासाठी आदर्श ठरावा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, या योजनेचा आदर्श ममावळ पॅटर्नफ आपण मावळात बनवू व त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करू, हा मावळ पॅटर्न जिल्ह्यासाठी आदर्श असेल, असा विश्वास व्यक्त केला.
110 नवीन लाभार्थ्यांना आदेश, 127 कुटुंबांना चाव्यांचे वितरण
या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यातील 66, रमाई आवास योजनाअंतर्गत 34 आणि यशवंत आवास योजना (ठाकर समाज) अंतर्गत 10 अशा एकूण 110 नव्या लाभार्थ्यांना घरकुल आदेश देण्यात आले. याशिवाय, आतापर्यंत 127 लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट्स देण्यात आल्या.
गायरान व खासगी जमिनींवर घरकुलासाठी जागा वाटप
या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या वाटपाचा होता. मावळ तालुक्यात प्रधानमंत्री जन मन घरकुल योजनेअंतर्गत 259 आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 122 लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी 7/12 उतारे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कोटमवाडी येथील काही लाभार्थ्यांना वनविभागातून तर शिवली, कुणे नामे व ओव्हळे गावांतील लाभार्थ्यांना खासगी जमीनमालकांनी सामाजिक जाणिवेतून बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून दिली.