सकाळ-संध्याकाळ वाहनांची गर्दी; आयटीयन्सचा संताप
भुजबळ, भूमकर चौक वाहतूक कोंडीचे हॉट स्पॉट
पंकज खोले
पिंपरी : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्या हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या आजपर्यंतच्या अनेक उपाययोजना निष्फळ ठरल्या आहेत. हिंजवडीमध्ये सकाळी कार्यालय गाठणे तसेच सायंकाळी घरी परतणे, हे एखाद्या शिक्षेप्रमाणे झाले असून, कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांची चढाओढ लागल्याचे दिसून येते. या कोंडीस बेशिस्त वाहतूक, चुकीचे नियोजन अन् संबंधित यंत्रणांतील समन्वयाचा अभाव, या गोष्टी कारणीभूत ठरत असल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. (Pimpari Chinchwad News)
हिंजवडी आयटी हबमध्ये सकाळी कार्यालय गाठताना तसेच संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेस फेज 1 ते 3 परिसरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी झालेली असते. वाहनचालकांना काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तासन् तास कोंडीत घालवावे लागतात. परिणामी, कार्यालयात जाणारे आणि घरी परतणारे आयटी कर्मचारी अक्षरशः हैराण झाले आहेत. या भागातील रस्ते अरुंद असून, पर्यायी मार्गांची कमतरता आहे; तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच जटिल होत आहे.
लक्ष्मी चौक तसेच विनोदे वस्तीपासून पुढे विनोदे सर्कल असून, या चौकातदेखील कोंडी होते. या लोकवस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे येथून बांधकाम साहित्य घेऊन जाणार्या वाहनांची तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते; तसेच रस्त्याच्या कडेला खासगी प्रवासी वाहने थांबवली जातात; परिणामी रस्ता प्रशस्त असूनही मोठ्या कायम वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी एकमेव असलेले सीएनजी पंप भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे रस्त्यावर मोठा अडथळा निर्माण होतो.
आयटी पार्कमधून बाहेर पडताना भूमकर चौकाच्या दिशेने जाण्यासाठी हा केवळ एकच मार्ग आहे. त्यामुळे लक्ष्मी चौकातून अथवा कस्तुरी चौकातून डाव्या बाजूने जावे लागते. या चौकात अवजड वाहनांची संख्या तुलनेने अधिक असल्याने येथे कायम कोंडी होते. येथील कोंडी सोडविण्यासाठी एक अथवा दोनच पोलिस कर्मचारी असल्याने ते ही परिस्थिती हाताळण्यास अपुरे पडतात. लक्ष्मी चौकातून येणारा वाहनांचा लोंढा आणि कस्तुरी चौकातील वाहने येथे एकत्र येत असल्याने येथेही कोंडी उद्भवते. घरी पोचण्याच्या घाईत वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून कोंडीत आणखी भर घालत असल्याचे दिसून येते; तसेच येथील रस्त्यालगतचे अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक या गोष्टीदेखील या चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.
चिंचवड, थेरगाव, निगडी, पिंपरी या ठिकाणी राहणारे आयटीयन्स, कर्मचारी भूमकर चौकातून ये-जा करतात. सब वेद्वारे या चौकतून पुढे आयटी पार्कला जाता येते; मात्र सब वे असल्याने तसेच रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी आहे. कोंडी सोडविण्यासाठी आय टी पार्ककडे जाणार्या मार्गाचा पुढील वाय जॅक्शन पोलिसांनी बंद केला असून, विनोदी वस्तीकडे वाहनांना जाता येत नाही. परिणामी, वाहनांना यू- टर्न मारुन जावे लागते. दरम्यान, हा मार्ग बोटल नेक (निमुळता) असल्याने भूमिगत मार्गात वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यातच पुणे- बंगळूर रस्त्यावरुन येणार्या वाहनांचीदेखील येथे भर पडते.
हिंजवडीत प्रवेश करण्यासाठी बाणेर, पाषाण येथून येणारे आयटीयन्स भुजबळ चौकाचा वापर करतात. तर, औंध, पिंपळे सौदागर, निलख आणि वाकडमधील कर्मचारी या चौकातील उड्डाण पुलाच्या माध्यमातून आयटी पार्कमध्ये प्रवेश करतात; मात्र हा उड्डाणपूल अतिशय अरुंंद असल्याने येथे कायमच वाहतूक कोंडी उद्भवते. येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकी, छोटी वाहने ही भुजबळ चौकातून म्हणजेच उड्डाण पुलाखालील मार्ग निवडतात; मात्र या ठिकाणी प्रवासी बसेस, खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्ता अडवून ठेवतात. त्यातून वाट काढत आयटी कर्मचार्यांना आपले कार्यालय गाठणे एक दिव्य ठरते.
आयटी पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा महत्त्वाचा चौक आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. साहजिकच याठिकाणी कोंडी उद्भवते. या चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आजपर्यंत अनेकदा उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र सध्यातरी येथील कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. वाहतूक पोलिसांकडून येथे एकेरी वाहतूक, सिग्नल यंत्रणा, बॅरिकेड्स उभारणे इत्यादी उपाय करण्यात आले; मात्र वाहनचालकांचा त्रास आजही कमी झालेला नाही. येथून ये-जा करणार्या वाहनांना पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावरून इन्फोसिस सर्कलमधून पुढे जावे लागते. या ठिकाणी कोंडी होत नाही; मात्र वाहनांचा वेगामुळे येथे अपघाताच्या घटना घडतात; तसेच विरुद्ध बाजूने येणार्या वाहनांमुळे काही काळ कोंडी होते; तसेच येथील चौकात वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.
भूमकर चौकातून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक किलोमीटर अंतरावर वाहनांना अडकून पडावे लागते. हा चौक भटेवरानगरपासून ते पुढे छत्रपती शिवाजी चौकात जातो; मात्र या चौकात चारही बाजूने येणार्या वाहनांची संख्या आणि वाहतूक पोलिसांचा अभाव असल्याने येथे कोंडी होते. वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने व विनोदे वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर खोदकाम केल्याने येथे वाहतुकीचा वेग मंदावतो. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या कोंडीतून मार्ग काढणे आयटीयन्स कर्मचार्यांना जिकिरीचे बनत चालले आहे.
भुजबळ चौकातून कशीबशी वाट काढत पोहचणार्या आयटी कर्मचारी, प्रवाशांना पुढे मधुबन हॉटेल सर्कल चौकात अडकून पडावे लागते. या सर्कलमधून वाहने विरुद्ध दिशेने येतात. तर, काही वाहने ही कस्तुरी चौकातून या ठिकाणी येतात. त्यातच या ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने पुढे जाण्याच्या नादात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच तुटलेले बॅरिकेड्स आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग आणखीच मंदावतो. त्यामुळे येथील कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आयटीयन्सचा साधारणत: 15 ते 20 मिनिटांचा वेळ खर्ची पडतो.
इन्फोसीस फेज 1 या चौकातून डाव्या बाजूने फेज 2 कडे रस्ता जातो. तर, उजव्या बाजूस मेझा 9 चौक आहे. तेथून पुढे पुन्हा छत्रपती शिवाजी चौकातून वाहने बाहेर पडतात. वाहनांसाठी हा मार्ग एकेरी आहे. या चौकात मेट्रोचे काम अपूर्ण असल्याने येथे कायमच कोंडी होते. त्यामुळे फेज 2 येथून येणार्या वाहनांना याठिकाणी अडकून पडावे लागते; तसेच येथूनच एक मार्ग हा लक्ष्मी चौकात जातो. या चौकात विरुद्ध बाजूने येणार्या वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे या चौकापासून ते छत्रपती शिवाजी चौक या अर्धाकिलोमीटर रस्त्यावर मोठी कोंडी होते, परिणामी आयटीयन्सना तासनतास अडकून पडावे लागते.
एकूण कंपन्या : 234
(फेज 1 : 76, फेज 2 : 98, फेज 3 : 60 )
एकूण क्षेत्रफळ : 683 हेक्टर
एकूण कर्मचारी : 4 लाख 20 हजार
रस्त्याची लांबी : 28. 84 किलोमीटर
एसटीपी : 4.0 एमएलडी
वाहनांची संख्या अंदाजे 1 लाख 60 हजार (मोटारी 60 टक्के, दुचाकी 25 टक्के, प्रवासी 15 टक्के)
नियोजित रस्ते ः फेज 1 ते फेज 3 (माण रस्ता), शिवाजी चौक ते स्मशानभूमी, लक्ष्मी चौक उड्डाण
मेट्रोच्या अपूर्ण कामाचा अडथळा
उघडी गटारे, खोदकामे सुरू
अरुंद रस्ते, हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण
पाचही चौकात वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या;
रस्त्याची तात्पुरती डागडुजी
बेशिस्त पार्किंग, खासगी प्रवासी, वाहतूक थांबा,
वाहनांचे वाढलेले प्रमाण