

पिंपरी : चिंचवड येथील एलप्रो मॉलच्या जवळ असलेल्या हेरिटेज प्लाझा या इमारतीला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली असून, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. इमारतीतील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या आणि जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात सुरक्षित अंतर राखण्यात आले असून, पोलीस वाहतूक नियंत्रित करण्यासाठीही तैनात झाले आहेत. इमारतीतील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.