harshvardhan patil candidency
हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीPudhari

Maharashtra Politics | हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शरद पवारांकडून घोषणा

पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
Published on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही विधानसभेत पाठवा, राज्यात पद देण्याची जबाबदारी माझावर सोपवा, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी सोमवारी (दि. ७) घोषित केली.

इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश सोहळा सोमवारी (दि. ७) झाला. या वेळी इंदापूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, विविध संस्था, ग्रामपंचायती, सोसायटी, दूध संस्था यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, महिला यांनीही पक्षात प्रवेश केला.

या वेळी अंकिता पाटील ठाकरे, अॅड. शरद जामदार, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, देवराज जाधव, मुरलीधर निंबाळकर, अॅड, कृष्णाजी यादव आदींसह काही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, मला नेहमी वाटायचे हर्षवर्धन पाटील हे रस्ता चुकले आहेत, त्यांचा आजचा निर्णय हा इंदापूरएवढा मर्यादित नसून राज्याला दिशा देणारा ठरणारा आहे.

सहकार क्षेत्रात विश्वासाने नाव घ्यायचे म्हटले तर प्रथम नाव हर्षवर्धन पाटील यांचेच डोळ्यासमोर येते. देशपातळीवरील साखर कारखाना संघटनेमध्ये हर्षवर्धन पाटील प्रमुख म्हणून काम करत असल्याने येथेही हर्षवर्धन पाटील यांची आम्हास मदत होत आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांना आमच्या पक्षात मोठे महत्त्व मिळणार आहे, त्यांना महाराष्ट्रात काम करावे लागेल. महायुती सरकारमध्ये निधी आणून २० टक्के कमिशन घेतले जात आहे, अशा या भ्रष्ट सरकारपासून जनतेची सुटका करायची आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले, मी पक्ष प्रवेशाचा निर्णय हा इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी घेतला आहे.

या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, मधुकर भावे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, अशोक घोगरे, सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी आ. अशोक पवार, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, अंकुश काकडे, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अॅड. आशुतोष भोसले यांनी मानले. इंदापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

इंदापूरची मलिदा गैंग संपवा

शरद पवार मी प्रशासनामध्ये काम केले आहे, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. त्यांच्याकडून इंदापूर तालुक्यातील सध्याच्या कारभाराबद्दल मिळालेल्या माहितीवर चर्चा न केलेलीच बरी.

अलीकडे काहींनी इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली आहे, अशी टीका विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर करत शरद पवारांनी भाषणात इंदापूरची 'मलिदा गैंग' संपवा असा हल्लाबोल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news