कार्ला : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात गुरुवार (दि. ३) घटस्थापना होणार असून, मंदिर देवस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी समाजाची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात. गुरुवारी सकाळी सात वाजता एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी, गुरव, पुजारी प्रतिनिधी यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना सहजतेने दर्शन घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पायऱ्यावरील गर्दी कमी करण्यासाठी दर्शनाच्या रांगा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, गडावर भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
विनाअडथळा गडावर जाता यावे, याकरिता एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
हिंजवडी आयटी परिसरात घटस्थापनेची लगबग मागील पंधरा दिवस सुरू असलेला पितृपक्ष आज सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त झाला. त्यानंतर गुरुवारपासून सुरू होणार्या नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, पूजेच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची चाहूल देवीच्या भक्तांना लागली आहे. घटस्थापनेपासून अनेक जण नऊ दिवस उपवास करतात. घराची साफसफाई केली आहे. घरातील पूजेची आणि आवश्यक भांडी चकाचक केली आहेत. कासारसाई येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोधड्या धुण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
मागील काही दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी गर्दी वाढली आहे. धुवून वाळलेले कपडे तेथेच वाळत टाकल्यामुळे परिसर रंगबेरंगी दिसत आहे.
पिंपळे गुरव गावठाण लगत असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी झाली असून, गुरुवारी सकाळी घटस्थाना होणार आहे. यानिमित्त मंदिरात होमहवन, भजन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी मंदिर सभोवताली भव्य मंडप, स्टेज उभारण्यात आला आहे.
तसेच, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने करण्यात आली आहे. मंदिराच्या सुरुवातीला कमान उभारण्यात आली आहे. मंदिरातील प्रवेशद्वारावर असणारे देवीचे वाहन सिंह, तसेच दगडांपासून घडवून नव्याने उभारण्यात आलेली पंधरा फुटी दीपमाळ लक्षवेधी ठरत आहे. देवीची विधिवत पूजा, सजावट, नऊ दिवसांची नऊ रूपे साकारण्यात येणार आहेत.