पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांची बैंक खाती रिकामी करण्यासाठी 'स्कॅमर्स' दररोज नवनवीन फंडे वापरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये मागील आठ महिन्यांत सुमारे अडीचशे जणांची फसवणूक झाली असून, यामध्ये २५ कोटींची रकम गेल्याचे सांगितले जाते. यातील विशेष बाब म्हणजे या 'मोडस ऑपरेंडी'ला बळी पडणारे सर्वजण उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी असून, त्यापैकी अनेकजण मोठ्या पदांवरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत,
'डिजिटल अरेस्ट मोडस' वापरून फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता अधिक सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, अधिकारी टार्गेट केले जात आहेत. राज्यात दररोज 'डिजिटल अरेस्ट'चे गुन्हे मोठ्या प्रमाणावर नोंद होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात तब्बल २५० जणांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून २५ कोटींना गंडा घालण्यात आल्याचे समोर आल्यानंतर, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांच्या सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.
या मोडस ऑपरेंडीमध्ये स्कॅमर्स स्वतःला पोलिस, सीबीआय, आयटी, ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून टार्गेट असलेल्या नागरिकांना फोन करतात. 'ड्रम्स तस्करीत तुमचा मोबाईल क्रमांक सापडला आहे. तुमच्या क्रमांकावरून विदेशात फोन करण्यात आले आहेत. तुमच्या फोनवरून दहशतवाद्यांशी बोलणे झाले आहे, पैशांची देवाण-घेवाण झाली आहे. तसेच, तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होणार आहे.' अशी बतावणी करतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. या अडचणीतून सुटका कशी करावी, याबाबत माहिती विचारतात.
दरम्यान, हे तोतया पोलिस अधिकारी 'व्हिडिओ कॉल' करून गुन्हा दाखल झाल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देतात. तपास आणि चौकशीच्या नावाखाली तोतये पोलिस अधिकारी संबंधितांची चौकशी करतात. गुन्ह्याबाबत अनेक प्रश्न विचारतात. नागरिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येते. यातून सुटका करण्यासाठी सुरुवातीला ३ ते ५ लाख रुपयांची मागणी होते. अनेक वृद्ध अटकेला घावरून पैसे अकाउंटमध्ये टाकतात. पुन्हा मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती विचारतात. ती माहिती मिळताच वृद्धाच्या खात्यातील सर्व पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात जमा करून घेतात.
नागरिकांच्या तक्रारीनंतर, महाराष्ट्र सायबर विभागाकडून त्वरित तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. डिजिटल अरेस्टचे हे रॅकेट चीन, हाँगकाँग आणि दुबई येथून चालत असल्याचे डिजिटल डिव्हाईसच्या 'आयपी अड्रेस'वरून समोर आले आहे. भारतात केवळ कॅश काढून ती इतर करन्सीमध्ये कन्व्हर्ट केली जाते.
व्हिडीओ कॉलवर सावज हेरणारी आणि प्रत्यक्ष पैसे काढून इतर करन्सीमध्ये बदलवून घेणाऱ्या टीम वेगवेगळ्या आहेत. कंबोडिया, श्रीलंका या ठिकाणांहून भारतातील नागरिकांशी व्हिडीओ कॉलवर बोलले जाते. त्यासाठी तेथे शासकीय कार्यालयाचा सेटअप तयार करण्यात आल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलवरूनच डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगतात. म्हणजे तुमच्याच घरात पोलिसांच्या नजरकैदेत असल्याचे सांगून व्हिडिओसमोरच बसून राहण्यास सांगतात, कॅमेरा बंद करण्याची मनाई केली जाते.
यातील विशेष म्हणजे व्हॉट्स अॅपवर ऑनलाईन हजेरीदेखील घेतली जाते. स्कॅमर्सने मॅसेज पाठविल्याबरोबर 'हजर सर' असे उत्तर द्यावे लागते. घरात डिजिटल अरेस्ट करून घेणे शक्य नसल्यास लॉजवर जाऊन राहण्यास सांगितले जाते.
सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना फसवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे बनावट सेटअप तयार केले आहेत. व्हिडिओ कॉल केल्यानंतर तोतया अधिकारी पोलिसांचा गणवेश घालून जाणीवपूर्वक पाठीमागे फिरत राहतात.
एखाद्या मोठ्या शासकीय कार्यालयातील बातावरण दाखवून घाबरवले जाते. इंडियन सर्विसमधील अधिकारी व्हिडीओ कॉलवर थेट बोलत असल्याने नागरिकांची पाचावर धारण बसते. याचाच फायदा घेत स्कॅमर्स गळाला लागलेल्या नागरिकांची बैंक खाती रिकामी करतात.
सायबर अरेस्टच्या गुन्ह्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना तपास करताना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकदा बैंक खात्यावरील राकम गेली, की ती दुसऱ्या जमा झालेल्या खात्यातून काही मिनिटांच्या आत काढली जाते. त्यानंतर इतर करन्सीमध्ये कन्व्हर्ट करून रक्कम बाहेर देशात जाते. त्यानंतर रकम माघारी मिळवणे अवघड होते. त्यामुळे सायबर चोरट्यांकडून होणारी फसवणूक आणि मनःस्ताप टाळण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी डिजिटल ओस्ट ही नवी मोडस वापरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या नावाने फोन करून डिजिटल अरेस्ट बाबत सांगितल्यास दाद देऊ नये. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक, पिंपरी-विसका