

murder of a minor boy
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली. याप्रकरणी तिघांचा सहभाग असल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली. त्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. (Pimpari chinchwad news update)
सोहम सचिन शिंदे (17, माऊली नगर कॉलनी, दिघी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नामदेव ऊर्फ निलेश सोमनाथ शिंदे (25, रा. दिघी), शुभम पंढरीनाथ पोखरकर (22, रा. दिघी), सुमित ज्ञानेश्वर शिंदे (28, रा. दिघी), ओंकार मिलिंद पाटोळे (23, रा. आळंदी), ओंकार सुभाष हिवराळे (21, रा. चर्होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोहम याचे वडील सचिन प्रल्हाद शिंदे (वय 46) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सोहम शिंदे हा त्याच्या मित्रांसोबत वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सोहम याला शिवीगाळ केली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आरोपींनी कोयत्याने सोहमच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोहमला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता विरोधी पथकाने अवघ्या काही तासात नामदेव, शुभम आणि सुमित या तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ओंकार पाटोळे आणि ओंकार हिवराळे या दोघांना अटक केली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.