

पिंपरी : अनधिकृत प्रार्थनास्थळांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 24 एप्रिलला नोटिसा बजावल्या आहेत. त्याविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर 25 एप्रिलपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या (आठवले गट) वाहतूक आघाडी आणि विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढेल, या धास्तीने शुक्रवारी (दि. 2) महापालिका भवनाभोवती मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या भागांतील सर्व रस्ते वाहतुकीस बंद केले होते.
31 अनधिकृत प्रार्थनास्थळांना नोटीस
महापालिकेकडून कुदळवाडीत मोठी धडक कारवाई करत अनधिकृत भंगार गोदामे, लघुउद्योग व विविध आस्थापना भुईसपाट करण्यात आले. त्या वेळी प्रार्थनास्थळांना कारवाईतून वगळण्यात आले होते. मात्र, आता महापालिकेकडून अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार 31 अनधिकृत प्रार्थनास्थळांना 24 एप्रिलला नोटीस बजावण्यात आली आहे. बांधकाम काढून घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ओळखपत्र असलेल्यांनाच पालिकेत प्रवेश
त्याविरोधात महापालिका भवनासमोर आंदोलन सुरू आहे. महापालिका प्रशासन तसेच, आयुक्त चुकीच्या पध्दतीने कारवाई करीत आहेत. जाणीवपूर्वक लक्ष्य करून शहरातील जातीय सलोखा व शांतता बिघडविण्यासाठी कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनात आज नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात धरून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या भागांतील सर्व रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले होते. जागोजागी पोलिस थांबले होते. तसेच, महापालिका भवनात जाण्यास अटकाव केला जात होता. ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला गेला नाही. महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना मागील प्रवेशद्वाराने बाहेर पडावे लागले. आंदोलन सुरळीत पार पडल्याने सायंकाळनंतर बंदोबस्त हटविण्यात आला.
आयुक्तांसोबत बैठक लावणार
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व शहर अभियंता मकरंद निकम यांची भेट घेतली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. आयुक्त सिंह हे 7 मे रोजीपर्यंत पॅरिस येथे पर्यटनासाठी गेले आहेत. ते आल्यानंतर बैठक आयोजित केली जाईल, असे पत्र शहर अभियंता निकम यांनी शिष्टमंडळास दिले. त्यानंतर शिष्टमंडळ माघारी फिरले.