

पिंपरी: सावकारांच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबाने झोपेच्या गोळ्या खाऊन गळफास घेत सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. यात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे पतीचे प्राण वाचले असून, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा नोेंद करण्यात आला आहे.
शुभांगी हांडे (36) आणि धनराज हांडे (9) अशी मृतांची नावे असून, वैभव हांडे (45) हे गंभीर जखमी झाले. हे कुटुंब चिखलीतील सोनवणेवस्ती येथे वास्तव्यास होते. याप्रकरणी वैभव हांडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी संतोष कदम (47), सुरेखा कदम (35), संतोष पवार (40) आणि जावेद खान (32) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव हांडे यांनी आरोपी संतोष कदमकडून सहा लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने घेतले होते. महिला आरोपीकडून दोन लाख रुपये, संतोष पवारकडून साडेसात लाख रुपये आणि जावेद खानकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची बहुतांश रक्कम परतफेड करूनही आरोपींनी तगादा लावला होता.
महिला आरोपीकडून घेतलेल्या दोन लाखांच्या बदल्यात हांडेंनी 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. तरीही 14 लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा अट्टहास ती करत होती. संतोष कदमला 9 लाख 50 हजार रुपये, एक एकर जमीन आणि महिला आरोपीला दरमहा 20 हजार रुपये दिल्यानंतरही त्यांचा तगादा थांबला नाही.
आरोपींनी वैभव हांडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण करून मानसिक त्रास दिला. आरोपी जावेद खान याला चार लाख 50 हजार रुपये व्याज स्वरूपात दिले गेले होते, तर संतोष पवारला साडेसात लाख रुपये देऊनही त्यांचा तगादा कायम होता. या मानसिक त्रासाला कंटाळून हांडेंनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेपूर्वी हांडेंनी मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्या खाऊन घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. या घटनेत पत्नी शुभांगी आणि मुलगा धनराज यांचा मृत्यू झाला; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वैभव हांडे यांचे प्राण वाचले. या प्रकरणी चिखली पोलिस तपास करत आहेत.
मोठ्या मुलाला पाठवली सुसाइड नोट
घटनेपूर्वी वैभव हांडे यांनी आपल्या 14 वर्षीय मुलाला मुंबईतील नातेवाइकांकडे पाठवले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलाच्या मोबाईलवर सुसाइड नोट पाठवली. मुलाने सुसाइड नोट वाचल्यानंतर घरी फोन केला मात्र, पालकांनी तो न उचलल्याने त्याने शेजार्यांना ही माहिती दिली. शेजार्यांनी पोलिसांना कळवले. चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वैभव हांडे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.