Bombshell Found in pimpari
पिंपरी : भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य तणाव वाढत असतानाच पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (दि. 9) दुपारी नऊ जुने बॉम्ब शेल सापडले. ज्यामुळे शहरात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरात तपासणी सुरू केली.
पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास हे जुने बॉम्ब शेल आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून ताब्यात घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली. मात्र, आणखी कोणतेही बॉम्ब शेल अथवा संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. सापडलेले बॉम्ब शेल तपासणीसाठी संरक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारचे बॉम्ब शेल यापूर्वीही आढळून आले आहेत. शुक्रवारी सापडलेली शेल चोरट्या मार्गाने भंगारमध्ये आणली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य तणाव निर्माण झाला आहे. देशभर सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रिलही घेण्यात आले. हे मॉकड्रिल यशस्वी झाल्यानंतर सर्व यंत्रणा युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून आले. दरम्यान, सगळीकडे अलर्ट असताना बॉम्ब शेल सापडल्याने यंत्रणांची धावपळ झाली.