पिंपरी : चिंचवड येथे पवना नदीवर बटरफ्लाय (फुलपाखरू) आकारातील स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणार्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा पूल सात वर्षांनंतरही अपूर्ण स्थितीत आहे. महापालिकेच्या या कासवगती कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिंचवडगाव व थेरगाव या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे. थेरगाव येथील विकास आराखड्यातील 18 मीटर रस्त्यावर हा पूल तयार केला जात आहे. मोरया गोसावी मंदीरपासून काही अंतरावर हा पूल आहे.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. कामासाठी 25 कोटी 19 लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे. या पुलासाठी नदीपात्रामध्ये एकही पिलर टाकलेला नाही. त्यामुळे पवना नदीचा प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
पुलावरील डांबरीकरण आणि जोडस्त्याचे काम सुरू आहे. 107 मीटर लांबीचा हा पूल आहे. 18 ते 28.20 मीटर इतकी पुलाची रुंंदी आहे. कामास सात वर्षे लोटली तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. पुलाला जोडणार्या चिंचवड तसेच, थेरगाव या दोन्ही बाजूचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
चिंचवडगाव आणि थेरगाव या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे. धनेश्वर मंदिराजवळ छोटा पूल आहे. तो पूल अरुंद असल्याने तेथून टेम्पो, ट्रॅक, बस अशा अवजड वाहनांची वाहतूक होत नाही. त्यामुळे प्रसूनधाम सोसायटीशेजारी नव्याने उभारण्यात येत असलेला नवा बटरफ्लाय पूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पुलाने दोन्ही बाजूला सुलभपणे ये-जा करता येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
सोसायटीचा अडथळा दूर झाल्याने काम सुरू
बटरफ्लाय पुलाच्या जोडरस्त्याजवळ एका हाऊसिंग सोसायटीची सीमाभिंत आहे. खोदकामामुळे भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेत सोसायटीने पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे हे काम रखडले होते. सोसायटीचे पदाधिकारी, ठेकेदार व महापालिका अधिकारी यांची पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत या कामास होकार दिल्याने काम सुरू करण्यात आले आहे, असे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.