

पंकज खोले
पिंपरी : उद्योग व्यवसायांसाठी वीज आणि पाण्याची आवश्यकता असते. विजेची समस्या कायम आहे; मात्र आता गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुर्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. परिणामी, येथील जे ब्लॉक परिसरातील काही कंपन्यांना विकतचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे. परिणामी, विकतचे पाणी घ्यावे लागत असून, एका टँकर पाठीमागे 8 हजार रुपये मोजावे लागतात.
भोसरी एमआयडीसी जे ब्लॉक परिसरामध्ये अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील काही कंपन्यांमध्ये पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याचा तक्रारी होत आहेत. या ठिकाणी असलेल्या चढ-उतार आणि कमी अधिक उंचीमुळे पाणीच येत नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या कमी अधिक पुरवठ्यामुळे वेगवेगळी कामे थांबतात. अनेक ऑपरेशन आणि मिक्सिंगच्या कामामध्ये पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाणी नसल्याने अनेकदा कामे बंद ठेवावी लागतात. परिणामी कामगारांना आणि इतर कर्मचार्यांना बसून पगार द्यावा लागतो. दुसरीकडे, एमआयडीसीच्या म्हणण्यानुसार होणार पाणीपुरवठा हा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्याच्या तक्रारी नसल्याचे एमआयडीसीच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, वाढत जाणारी पाण्याची मागणी आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सर्व कंपन्यांमध्ये समप्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी कंपन्यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये एमआयडीसी कडून 90 एमएलडी पाण्याचा दररोज पुरवठा होतो.
एमआयडीसी प्रशासन पाणी मुबलक असल्याचे सांगत आहे. मात्र, पाणी वाटप नियोजन जमत नाही. ते होत नसेल तर उद्योजकांना कूपनलिका करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.. प्राधिकरणाच्या इंडस्ट्रीमध्ये बोअर (कूपनलिका) घेण्यास परवानगी आहे. मात्र, एमआयडीसी परवानगी देत नाही, त्यामुळे एक मोठी समस्या उभी ठाकली आहे.