

पिंपरी : सूज्ञ पिंपरी- चिंचवडकरांनी मला २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडून दिले. त्यावेळी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे या मुद्यांवर मी निवडणुकीला सामोरा गेलो. तत्कालीन प्रस्थापितांविरोधात शहरवासीय व भूमिपुत्र माझ्यासोबत राहिले. त्यामुळेच मी आजवर यशस्वीपणे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. (Assembly Election 2024 )
अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे भोसरीतून पुन्हा एकदा आमदार लांडगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत मी पिंपरी-चिंचवडकरांकडे मतरुपी 'दान' मागितले. त्यामुळे माझ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील ३४ सहकाऱ्यांना महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवले.
महापालिकेतील भाजपाची सत्ता असताना राज्यात २०१९ मध्ये सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीची सत्ता, कोविड महामारी यामुळे विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. काही विकासकामांचा निधी वळवण्यात आला, काही कामे हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवण्यात आली.
काही प्रकल्प रखवडवण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ मध्ये मी पुन्हा आपल्यासमोर आलो. त्यावेळीसुद्धा नागरिकांनी माझ्यावरील विश्वास किंचतही कमी होवू दिला नाही. आता पुन्हा मी २०२४ मध्ये निवडणुकीला सामोरा जात आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये सोडवलेले प्रश्न, मार्गी लावलेले विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या, सोसायटीधारकांच्या हितासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय यासह भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेला लढा अशा 'रिपोर्ट कार्ड'च्या आधारे '१० वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..' असे घोषवाक्य घेऊन मी भोसरी विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निमित्ताने पुन्हा निवडणुकीला सामोरा जात आहे.
पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांचा आदर्श घेऊन राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहीन, असा विश्वासही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या १० वर्षांतील विकास कामे आणि मार्गी लावलेले प्रलंबित प्रश्न याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडणार आहे. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे., अशी माझी भावना आहे. आगामी काळात प्रस्तावित सर्व विकासकामे मार्गी लावण्याचा माझा संकल्प आहे. शहराच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी मी निवडणुकीला सामोरा जात आहे. सूज्ञ पिंपरी- चिंचवडकर माझ्यासोबत आहेत.
महेश लांडगे, आमदार