

महाळुंगे : पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा ते चाकणदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन ठिकठिकाणी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच दोन ते तीन तास ही वाहतूककोंडी होत असल्यामुळे वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. तसेच पुणे-नाशिक महामार्गाचा श्वास वाहतूक कोंडीमुळे गुदमरला आहे. चिंबळीफाटा ते चाकण प्रवासासाठी तासंतास वाया जात असल्याने हा प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. परिणामी अनेक जणांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण रखडले असून त्यातच या रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सध्याचा रस्ता अपुरा पडत आहे.
चाकण ते भोसरी रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असून, या वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने दुतर्फा उभी केलेली असतात. त्यामुळे आळंदी फाटा, कुरुळी, मोई फाटा, चिंबळी फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बेकायदेशीर पार्किंग करणार्या वाहनचालकांना निर्बंध घालण्याची गरज असताना संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थ व प्रवाशी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्यावरील उभी करण्यात येणारी वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.